
जळगाव निंबायती (वार्ताहर) – राज्य परिवहन महामंडळाच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर मोफत बस पास योजनेअंतर्गत येथील अहिल्यादेवी शिक्षण संस्थेच्या गोविंदराव यशवंतराव पाटील कनिष्ठ महाविद्यालयातील इयत्ता १२ वी कला व विज्ञान शाखेच्या ८७ विद्यार्थिनींना मोफत पासचे वाटप करण्यात आले. ग्रामीण भागातील मुलींना शिक्षणासाठी सुरक्षित व मोफत बसने प्रवास करता यावा, यासाठी शासनाने ही योजना सुरू केली आहे. मालेगाव – मनमाड राज्य महामार्ग क्रमांक १० वरील जळगाव निंबायती येथील पाटील कनिष्ठ महाविद्यालयात येणाऱ्या मुलींची संख्या लक्षणीय आहे. अस्तगाव, खादगाव, नवसारी भार्डी, कोंढार, दऱ्हेल, बोयेगाव, कानडगाव, कुंदलगाव, चोंडी, आदी गावांमधील मुलींना लवकरात लवकर पास मिळावा या उद्देशाने ‘एसटी पास तुमच्या शाळेत’ या योजनेअंतर्गत मनमाड आगाराचे कर्मचारी वाहतूक अधिकारी दीपक हिरन यांनी पाटील विद्यालयात भेट देऊन पाचवी ते बारावी पर्यंत शिकणाऱ्या विद्यार्थिनींना सदर योजनेची माहिती दिली. तसेच ८७ मोफत पासचे वाटप केले. यावेळी संस्थेचे सचिव महेंद्र पाटील, समन्वयक निंबाजी शिंदे, विश्वस्त भिलाजी दुकळे, प्राचार्य पी. एन. पवार, पर्यवेक्षक व्ही. डी. काळे, जेष्ठ प्रा. पी. जी. माने, एस. टी. जाधव, सी. डी. राजपूत, जी. एस. जमधाडे, प्रा. प्रशांत देवरे, ए. व्ही. अहिरे, सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारींसह बहुसंख्येने विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी पर्यवेक्षक काळे यांनी प्रवास करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या अधिक असल्याने प्रवासासाठी दोन बस उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणी केली. सूत्रसंचलन परिवहन समितीचे पदाधिकारी प्रा. अमोल अहिरे यांनी केले तर आभार प्रा. पी. यु. शिंदे यांनी मानलेत.
