
जळगाव बु. (प्रतिनिधी ) शैक्षणिक वर्षाच्या पहिल्या दिवसाला आज प्रारंभ झाला.जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जळगाव बुद्रुक येथे मोठ्या उत्साहात प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला. नवागतांचे स्वागत अनोख्या पध्दतीने करण्यात आले. सर्वप्रथम गावातून वाजत गाजत या विद्यार्थ्यांना ट्रॅक्टर मधून शाळेत आणण्यात आले. जळगाव बुद्रुक गावाचे सरपंच श्री. विश्वनाथ कांदे यांनी नवागतांचे गुलाबपुष्प व मिठाई देऊन स्वागत केले. त्यामुळे कुतूहलाने हिरमुसलेल्या बालकांच्या चेहऱ्यावर हसू व आनंद ओसांडून वाहू लागला. ग्राम पंचायत सदस्य श्री. कृष्णा आहिरे, श्री.गावंडे, श्री.मोरे,सौ.आहिरे, श्री. गिते तसेच शा.व्य.स. चे अध्यक्ष श्री. नवनाथ सांगळे, सदस्य श्री. गोरख गिते, श्री सोनवणे,श्री.प्रविण कांदे,मुख्याध्यापक श्री.प्रकाश मोरे,व उपस्थित पालकांच्या हस्ते विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके, गणवेश, बूट सॉक्स चे वितरण करण्यात आले.

एक पेड माँ के नाम या उपक्रमांतर्गत शाळेच्या आवारात वृक्षारोपण करण्यात आले.गौरी सांगळे या 3 री च्या विद्यार्थीनीने नृत्य कला सादर करून विद्यार्थ्यांचे स्वागत केले. मान्यवरांच्या हस्ते पाहिलीच्या वर्गात फीत कापण्यात आली. त्यानंतर विद्यार्थ्यांचे औक्षण करून व पुष्पगुच्छ देऊन वर्गात प्रवेश देण्यात आला. शाळेला नारळाच्या झावळ्या तसेच फूलमाळांनी,रांगोळीने सजवण्यात आले. यासंबंधी प्रभातफेरीचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. प्रविण ठाकरे यांनी तर श्री शैलेश टिळेकर यांनी संयोजन केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेचे शिक्षकवृंद सौ.महाले,श्रीम सोनवणे,श्रीम.बोरसे,श्रीम.रोकडे, श्री. शेवरे, श्री.अमोल बच्छाव, श्री. गायकवाड, अंशकालीन निदेशक श्री. गोरे, श्री. येवले, श्रीम. नागरे आदींनी मेहनत घेतली.
