
मोरेवस्ती (प्रतिनिधी ) साप हा शेतकऱ्याचा मित्र असून तो दिसल्यास त्याला न मारता त्याच्या अधिवासात त्याला सोडून द्यावे,असे प्रतिपादन सर्पमित्र प्रभाकर नथू निकुंभ यांनी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मोरेवाडी येथे केले.सापाविषयी विविध अंधश्रद्धेबाबत उद्बोधन करतांना त्यांनी शाळेतील विद्यार्थी,पालक व ग्रामस्थ यांना सापाच्या विविध प्रजाती याबाबत सविस्तर माहिती देऊन उद्बोधन केले. विविध ऑपरेशनसाठी देण्यात येणारी भूल,कॅन्सर सारखा असाध्य आजार, करोना लसीमध्ये देखील सापाच्या विषाचा वापर होत असल्याचे सांगून वैद्यकीय क्षेत्रातील सापाच्या विषाचे महत्त्व त्यांनी विशद केले.साप कधीच कोणालाच स्वतःहून चावत नसतो तसेच तो कधीच कोणावर डाव धरत नसतो. साप कधीच दूध पीत नाही यासारख्या अनेक गैरसमजुतीबाबत त्यांनी उपस्थितांना उद्बोधन केले. याप्रसंगी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर मोरे उपाध्यक्ष नवनाथ पवार, शिक्षणतज्ञ अविनाश कर्नर,ग्रामपंचायत सदस्य भिमबाई मोरे,रोहिदास पवार,अंगणवाडी कार्यकर्ती सुनिता राठोड,मदतनीस छाया सानप,शिक्षिका योगिता कापुरे मुख्याध्यापक गणेश बागुल व विद्यार्थी उपस्थित होते कार्यक्रमाच्या शेवटी मुख्याध्यापक गणेश बागुल यांनी प्रभाकर निकुंभ यांचा शाळेच्या वतीने सत्कार केला व त्यांचे जाहीर आभार मानले.
