
नांदगाव (प्रतिनिधी ) मविप्र संचलित न्यू इंग्लिश स्कूल नांदगाव विद्यालयात प्रवेशोत्सव प्रसंगी नवोदितांचे औक्षण करून, पुष्पगुच्छ देऊन व ढोल ताशांच्या गजरात स्वागत करण्यात आले . या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शालेय समितीचे अध्यक्ष श्री विजय काकळीज सर होते. प्रास्ताविक विद्यालयाचा मुख्याध्यापिका श्रीमती काळे मॅडम यांनी केले. त्यांनी मंचावर उपस्थित असणाऱ्या सर्व मान्यवरांचे शब्द सुमनांनी स्वागत केले . शिक्षण हा जीवनाचा एक अविभाज्य घटक आहे असे त्यांनी आपल्या प्रास्ताविकातून स्पष्ट केले.

मंचावर उपस्थित असणारे शालेय समिती अध्यक्ष श्री. विजय काकळीज सर ,संस्थेचे ज्येष्ठ सभासद काकळीज काका, श्री राजेश पाटील , तसेच इतर मान्यवरांचे व पालकांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. नवीन प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना पुस्तक वाटप याप्रसंगी करण्यात आली. तसेच सन २०२४/२५ मध्ये डॉ. सी. व्ही. रमण बाल वैज्ञानिक परीक्षेत तालुक्यात प्रथम क्रमांक मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांनी आरोशी बोरसे व वेदिका जाधव यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांना गौरवण्यात आले. तसेच मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या अभियानांतर्गत तालुक्यात द्वितीय क्रमांक विद्यालयास मिळाल्याबद्दल विद्यालयाचे शालेय समिती अध्यक्ष श्री काकळीज सर यांनी मुख्याध्यापिका श्रीमती काळे मॅडम व पर्यवेक्षक श्री शेवाळे सर यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार केला. आपल्या अध्यक्षीय भाषणात श्री काकळीज सर यांनी शिक्षणाचं जीवनात किती महत्त्व आहे, शिक्षणामुळे आपण देखील एखाद्या पक्षाप्रमाणे आपल्या जीवनात उंच भरारी घेऊ शकतो. हे त्यांनी विद्यार्थ्यांना समजावून सांगितले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विद्यालयातील सर्व शिक्षक ,शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी , विद्यार्थी व पालक यांचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाची सांगता पसायदानाने करण्यात आली.
