
नासिकक्लब ५८+ ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने आयोजित ‘जावे आनंदाच्या गावा’ या व्याख्यानाप्रसंगी कवी रवींद्र मालुंजकर, संघाचे अध्यक्ष जयराम वाघ, कामगारनेते प्रशांत कापसे यांच्यासह संघाचे सभासद
नाशिक:- (प्रतिनिधी ) विविध विडंबने, नव्याजुन्या विनोदी आणि आशयसंपन्न कविता यांची मेजवानी देणाऱ्या कवी रवींद्र मालुंजकर यांच्या अनोख्या शैलीतील सादरीकरणाने ज्येष्ठ नागरिक मंत्रमुग्ध झाले. नासिकक्लब ५८+ ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने ‘कवितावाचन’ या विशेष कार्यक्रमात ‘जावे आनंदाच्या गावा’ या विषयावर कवी रवींद्र मालुंजकर यांचे व्याख्यान नासिकक्लब सभागृहात आयोजित करण्यात आले होते. उत्तरोत्तर रंगत गेलेल्या व्याख्यानात कवी रवींद्र मालुंजकर यांनी त्यांच्या सुरेल आवाजात लोकप्रिय गीते, विडंबन कविता, वात्रटिका, हास्यकविता, गझल, पोवाडा, लोकगीते तसेच त्यांच्या ‘आठवांचे लक्ष मोती’ या काव्यसंग्रहातील- *लेक आभाळाचे मन/लेक सर्वश्रेष्ठ धन…* *तिच्या कर्तृत्वाने देई/जगा समृद्धीचे दान…*या ‘लेक’ कवितेतील आशयसंपन्न ओळींसह अंतर्मुख करणाऱ्या कवितांचे सादरीकरण करत ज्येष्ठ नागरिकांना निखळ हास्य आणि करुण रसाची मेजवानी दिली.

कार्यक्रमाला कामगारनेते प्रशांत कापसे यांच्यासह ज्येष्ठ नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला आणि संपूर्ण वातावरण आनंदमय झाले. संघाचे अध्यक्ष जयराम वाघ यांच्या सूत्रसंचालनाने कार्यक्रमाची रंगत वाढवली. नवीन सभासद रवींद्र सोनोने यांचे स्वागत करण्यात आले. रवींद्र गोडबोले, रोहिणी चोपडे, बाबाराव बिहाडे, सुशीला आंधोळकर, विजय निकते, कचरू सूर्यवंशी, कारभारी मोरे, भानुदास आडके आदी सभासदांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. पी.डी.काळे यांनी आभार मानले.
