
नांदगाव (प्रतिनिधी ) नांदगाव तालुक्यातील जातेगाव पासून जवळच असलेल्या चंदनपुरी येथे दिनांक 14 जून 2025 रोजी शनिवारी दुपारी अडीच ते तीन वाजेच्या सुमारास येथील अल्पभूधारक शेतकरी बाळू दौलत पवार हे शेतात काम करीत असताना अचानक ढगांच्या गडगडाला सह पावसाचे वातावरण निर्माण झाल्याने शेतकरी बाळू पवार यांनी आपल्या शेतातील घरापासून अंदाजे तीनशे फूट अंतरावर बैल बांधून घरात गेले असता काही वेळातच पाऊस सुरू झाला. यातच शेतात बांधलेल्या सात वर्षे वयाच्या बैलाच्या अंगावर वीज पडल्यामुळे त्या बैलाचा जागीच मृत्यू झाला. याबाबत माहिती मिळताच येथील माजी उपसरपंच संतोष डांगे यांनी तात्काळ तलाठी दिनेश परदेशी व पशुधन विकास अधिकारी डॉक्टर ए आर देवकर यांच्याशी संपर्क साधून त्यांना घटनेची माहिती दिली. त्यांनी येथील पशुधन पर्यवेक्षक डॉक्टर धीरज यादव यांना घटनास्थळी जाऊन पाहणी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले. क्या वरून पशुधन पर्यवेक्षक यादव यांनी बैलाची तपासणी करून कृतघोषित केले व शिवविच्छेदन करून अहवाल सादर केला. यावेळी नांदगाव पंचायत समितीचे डॉक्टर एन टी ताठे, पशुधन विकास विस्तार अधिकारी यांनी पंचनामा करून गट विकास अधिकारी पंचायत समिती नांदगाव यांना सादर केला. असे संतोष डांगे यांनी सांगितले. सदरच्या घडलेल्या घटनेमुळे चंदनपुरी येथे हळहळ व्यक्त होत असून शेतकरी पवार हे अल्पभूधारक शेतकरी असून त्यांची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने त्यांना तात्काळ नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी शेतकरी वर्गाकडून केली जात आहे.
