
नांदगाव (वार्ता) – दि.३ हिसवळ बु: ते हारदे वस्ती-मोहेगाव रस्त्यावरील हाडकी नाल्यात MRGS अंतर्गत अनधिकृत विहिरी खोदून नाल्यात दगड माती टाकून नाल्याचा मूळ प्रवाह बंद केल्यामुळे ज्ञानेश्वर सदगीर यांची मांडवड शिवारातील शेतजमीन गट नंबर ६७२/१/२ व MRGS योजनेअंतर्गत झालेल्या रस्त्याचे नुकसान होणार असल्यामुळे ज्ञानेश्वर सदगीर यांनी जमिनीचे होणारे नुकसान व जमीन वाचविण्यासाठी दिनांक ३ जून २०२५ पासून नांदगाव पंचायत समिती व तहसील कार्यालयाच्या गेटवर आमरण उपोषणास प्रारंभ केलेला आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की, हिसवळ बु ते हारदे वस्ती-मोहेगाव रस्त्यावरील हिसवळ बु: नजीक हाडकी नाल्यात हिसवळ बु: येथील शेतकरी विमलबाई मुरलीधर सदगीर व त्यांचे पती मुरलीधर नाथा सदगीर यांनी मनमानी करुन हाडकी नाल्याच्या मूळ प्रवाहामध्ये MRGS योजनेअंतर्गत मिळालेल्या विहीरीचे खोदकाम केल्यामुळे नाल्याचा मूळ प्रवाह बंद होऊन हाडकी नाल्याचे पाणी ज्ञानेश्वर सदगीर यांच्या शेतात जाऊन जमिनीचे नुकसान होऊ शकते. यास्तव श्री. सदगीर यांनी उपोषणाचा मार्ग अवलंबिलेला आहे.

सदर प्रकरणी शासन दरबारी वेळोवेळी तक्रार देऊनही त्याची दखल घेतल्या जात नाही यास्तव जोपर्यंत नांदगाव पंचायत समितीचे प्रशासन सदर प्रश्न मार्गी लावत नाही तोपर्यंत उपोषण सुरुच ठेवू असा इशारा च श्री. सदगीर यांनी पंचायत समितीच्या प्रशासनाला दिलेला आहे. आता पंचायत समिती चे प्रशासन काय निर्णय घेते याकडे तालुक्याचे व परिसरातील शेतकऱ्यांचे लक्ष लागून आहे.
