
नाशिक:- ग्रामीण भागातील परिस्थितीत आजही फारसा फरक झालेला दिसत नाही. शहरी आणि ग्रामीण भाग यांच्यातील दरी बऱ्याच प्रमाणात आहे. अशा परिस्थितीत रात्रंदिवस काबाडकष्ट करून आपलं जीवन जगणाऱ्या महादेव कोळी समाजाच्या वाट्याला आलेलं दु:ख आणि त्यातून निर्माण झालेलं जगण्याचं सामाजिक भान मांडणारं पुस्तक म्हणजे ‘कोळवाडा’ आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ आदिवासी साहित्यिक डॉ.गोपाळ गवारी यांनी केले. गिरणा गौरव प्रतिष्ठानच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त हुतात्मा स्मारकात आयोजित ‘पुस्तकावर बोलू काही’ उपक्रमाचे १५०वे पुष्प ‘कोळवाडा’ या पुस्तकावर गुंफताना ते बोलत होते. डॉ.तेजस्विनी कदम अध्यक्षस्थानी होत्या. डॉ.गवारी पुढे म्हणाले की, आदिवासी भागातील महादेव कोळी समाजाच्या वाट्याला आलेल्या अपरिमित वेदना, कष्टप्रद जीवन, सोसलेल्या यातना यांचे वास्तव चित्रण मांडण्याचा प्रामाणिक प्रयत्न या पुस्तकात केला आहे. महादेव कोळी समाजातील विविध व्यक्तिचित्रे उभी करून वास्तव परिस्थितीचा मागोवा घेतला आहे. जीवन जगत असताना संघर्ष-यातना भोगल्याशिवाय आणि सोसल्याशिवाय गत्यंतर नव्हते. अतिशय कठीण परिस्थितीवर मात करून कोळवाड्यातील माणसं स्वतःच्या कर्तृत्वावर मोठी झाली आहेत, असेही ते म्हणाले. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते करुणासागर पगारे आणि दिनकर पगार यांना ग्रंथभेट देण्यात आली. सुरेश पवार यांनी सूत्रसंचालन केले. राज्य कर्मचारी नेते मुक्तेश्वर मुनशेट्टीवार यांनी आभार मानले. दरम्यान येत्या शुक्रवारी (दि.६ जून) रोजी ‘पुस्तकानुभव’ या नव्या पुस्तकावर सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष प्रा.दिलीप फडके ऐसपैस गप्पा करणार आहेत.
