
नाशिक ( प्रतिनिधी)ज्येष्ठ साहित्यिक कमलाकरआबा देसले यांच्या तृतीय स्मृतिदिनानिमित्त मालेगाव येथे देसले परिवाराने आयोजित केलेल्या कविता सादर करताना अरुणराज प्रस्तुत ‘मायबाप’ या मैफिलीचे सादरकर्ते कवी राजेंद्र उगले आणि अरुण इंगळे.’मायबाप’ ही आई-वडिलांबद्दलची कृतज्ञता व्यक्त करणारी मैफल आज मालेगाव येथे सादर करताना वेगळीच भावना मनामध्ये होती. कविवर्य कमलाकरआबा आणि नाशिकच्या समस्त कविकुळाचा अतिशय जवळचा स्नेहबंध. आमच्या पिढीतले अनेक कवी घडण्यासाठी कविश्रेष्ठ खलील मोमीन सर आणि कमलाकरआबा यांनी अतोनात मेहनत घेतलेली आहे. तीन वर्षांपूर्वी कमलाकर आबांनी जगाचा निरोप घेतला. मात्र त्यांच्या परिवाराने त्यांच्या स्मृती जागवण्यासाठी गतवर्षी गझल संमेलन आणि यंदा मायबाप या मैफिलीचे आयोजन केले होते. कमलाकर आबांच्या स्मृती जागवताना त्यांच्या एकापेक्षा एक सरस रचनांनी राजेंद्र उगले आणि अरुण इंगळे या दोन्ही प्रतिथयश कवी-गायक आणि सादरकर्त्यांनी मैफिलीत रंग भरला. मालेगावमधील साहित्य क्षेत्रासह विविध क्षेत्रातील दिग्गज आणि देसले परिवाराचे सर्व आप्तेष्ट मोठ्या संख्येने उपस्थित होते. जवळजवळ अडीच तास रंगलेली ही अनोखी काव्यमैफील आणि आबांच्या स्मृती जागवताना आबांचा मित्र असल्याचा अभिमान द्विगुणीत झाला. देसले परिवाराचे सर्व सदस्य या मैफिलीसाठी खऱ्या अर्थाने राबले आणि आबांचा समर्थ वारसा त्यांचा परिवार तितक्याच जोमाने पुढे नेत आहे; हे बघून अतिशय समाधान वाटले. आबांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन…!*
