
नाशिक (प्रतिनिधी)- इयत्ता अकरावीची केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया ग्रामीण व शहरी भागांत अनेक कारणांनी अडचणीची ठरत आहे. विशेषतः अतिदुर्गम भागांत मोठ्या प्रमाणावर नेटवर्कच्या अडचणी असल्यामुळे ही प्रवेश प्रक्रिया पूर्वीप्रमाणे ऑफलाईन करावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्य राज्यशास्त्र कनिष्ठ महाविद्यालयीन परिषदने केली आहे. याबाबतचे निवेदन राज्याध्यक्ष प्रा. सुमित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक विभागीय अध्यक्ष प्रा. आण्णासाहेब सोनवणे व महासचिव प्रा. अमोल अहिरे यांनी शिक्षण उपसंचालक यांच्यामार्फत राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, शालेय शिक्षणमंत्री यांना पाठविले आहे. निवेदनात म्हटले आहे की, शैक्षणिक वर्ष २०२५-२६ पासून इयत्ता ११ वी केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेची व्याप्ती राज्यभर वाढवण्याबत व अधिक सूत्रतता आणण्याबाबतचा २५ फेब्रुवारी २०२५ रोजी शासन निर्णय झाला आहे. त्यानुसार ११ वी केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया जी पूर्वी प्रमुख महानगरामध्ये सुरू होती ती आता संपूर्ण ग्रामीण भागासह महाराष्ट्रात सुरू करण्यात आलेली आहे. त्यामध्ये सातत्याने होत असलेला गोंधळ, वारंवार बदलणारे वेळापत्रक, वेबसाईटच्या संदर्भातील तांत्रिक अडचणी, प्रशिक्षित नसणारे कर्मचारी तसेच ग्रामीण भागात व अतिदुर्गम भागात नेटवर्कच्या असलेल्या अडचणी, एवढेच नाही तर या ११ वी केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेमध्ये प्रशासनाकडून वेबसाईटमध्ये तांत्रिक अडचण तसेच नियोजनाचा मोठ्या प्रमाणावर अभाव दिसून येत आहे. या सर्वांमुळे पालक व विद्यार्थी यांची अत्यंत गोंधळाची स्थिती निर्माण झालेली संपूर्ण महाराष्ट्रात आढळून येते. या सर्व बाबींच्या अनुषंगाने ही ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया त्वरित रद्द करून ऑफलाईन पद्धतीने महाविद्यालय स्तरावर घ्यावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. या बाबतचे निवेदन शिक्षण उपसंचालक कार्यालय, जिल्हापरिषद माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयास नुकतेच देण्यात आले. निवेदनावर राज्याध्यक्ष प्रा. सुमित पवार, राज्य उपाध्यक्ष प्रा. सुरेश नारायणे, प्राचार्य शरद जोगी, राज्य सहसचिव डॉ. सुनील राठोड, प्रा. संजय सुतार आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.*छायाचित्र -* शिक्षण उपसंचालक कार्यालय नाशिक येथे निवेदन देतांना नाशिक विभागीय अध्यक्ष प्रा. आण्णासाहेब सोनवणे व विभागीय महासचिव प्रा. अमोल अहिरे आदी.
