
पुणे ( प्रतिनिधी)ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर काल झोपेत (१९ मे रात्री ) यांचे निधन झाले. डॉ. नारळीकर हे केवळ खगोलशास्त्रज्ञच नव्हते, तर विज्ञान लेखकही होते. त्यांनी *नाशिक येथे झालेल्या ९४ व्या आखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपदही भूषवले होते. कन्फॉर्मल ग्रॅव्हिटी थिअरी’साठी डॉ. जयंत नारळीकर जगभरात ओळखले जातात. चार दशकांहून अधिक काळ त्यांनी खगोलभौतिकी क्षेत्रात संशोधन केलं. आपल्या संशोधना सोबतच *समाजाभिमुख, विज्ञाननिष्ठ* भूमिकांसाठी ओळखले जात. त्यांनी लिहिलेल्या विज्ञानकथा आणि विज्ञानलिषयक लेखन लोकप्रिय ठरल्या आहेत.*डॉ. नारळीकरांची फलज्योतिषाला आव्हान देणारी भूमिका* असो, वा विज्ञान सोपं करून सांगण्यासाठी केलेलं मराठी विज्ञानकथालेखन असो, डॉ नारळीकर कायमच समाजाला सतत विचार करायला प्रवृत्त करणारं व्यक्तिमत्व राहिलं आहे. महाराष्ट्र सरकारने डॉ. नारळीकरांना २०१० साली ‘महाराष्ट्रभूषण’ पुरस्कार देऊन सन्मानित केले. भारत सरकारने डॉ. जयंत नारळीकर यांना ‘पद्मभूषण’ आणि ‘पद्मविभूषण’ या नागरी पुरस्काराने गौरवलं आहे.
