
सिन्नर (प्रतिनिधी) शेतकरी,कामगार,कष्टकरी, शेतमजूर,आर्थिक,सामाजिक आणि राजकीय वंचित घटकाला केंद्रबिंदू म्हणून वामनदादा कर्डक यांनी शोषित वंचित दुर्लक्षित घटकाची व्यथा वेदना आपल्या साहित्य गीत, कवन,गझल शाहिरीतून जगासमोर मांडली.जगभरात वामनदादा कर्डक यांचे साहित्य रसिक असून देशवंडी गावातील त्यांचे स्मारक अतिशय दयनीय अवस्थेत आहे.लोककवी डॉ.वामनदादा कर्डक यांचे देशवंडीतील स्मारक पूर्णत्वास नेऊन लोकार्पण करणे हि सत्ताधाऱ्यांची नैतिक जबाबदारी असल्याचे मत लोककवी वामनदादा कर्डक यांच्या हयातीत व फायदेशीर अनुमतीने स्थापन झालेल्या लोककवी वामनदादा कर्डक प्रतिष्ठानचे संस्थापक कार्याध्यक्ष प्रा.शरद शेजवळ यांनी व्यक्त केले.महामित्र परिवार,लोककवी वामनदादा कर्डक प्रतिष्ठान आद्य क्रांतिकारक राघोजी ब्रिगेड यांच्या वतीने येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक येथे वामनदादा कर्डक यांच्या २१ व्या स्मृतिदिनानिमित्त त्यांना त्यांच्या गीत गझल काव्य शाहिरीतून शाहिरी अभिवादन सभेच्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून प्रा.शरद शेजवळ हे बोलत होते. लोकशाहीर डॉ.वामनदादा कर्डक यांनी विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आपल्या ओजस्वी वाणीतून आणि समर्थ लिखाणातून महाराष्ट्राच्या घरांघरांत खेड्यापाड्यात, वाडीतांड्यांत पोहचवण्याचे काम केले.

बुद्ध, फुले, आंबेडकर यांचा विचार हा वामनदादांचा श्वास होता,ऊर्जाकेंद्र होते.हे विचार प्रभावीपणे प्रसारित करत वामनदादा जीवनाच्या शेवटापर्यंत फिरत राहिले असे मत जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते महामित्र दत्ता वायचळे यांनी व्यक्त केले.लोककवी डॉ.वामनदादा कर्डक प्रतिष्ठान नाशिक कलापथकाचे वामनदादांच्या निवडक गीतांचे सादरीकरण ह्यावेळी करण्यात आले. सागर भालेराव ह्यावेळी वामनदादा कर्डक यांचे पैदा हो तो भीमसा नर पैदा हो,एक नया आंबेडकर पैदा हो। हे गीत सादर केले तर सुनील कुर्हे खोपी कुपी सोडून साऱ्या माड्या लोळविणार,मी वादळ वारा,मी वामन वाणी जातो मी वामनवाणी गातो,जातो तिथे पेरीत जातो चिल्या पिल्यांचा चारा हे गीत सादर केले तर प्रा.शरद शेजवळ यांनी माणसा इथे मी तुझे गीत गावे असे गीत गावे तुझे हित व्हावे असे तुझे माझे नाते दळावे तुझ्या संकटाशी इथे मी लढावे हे गीत सादर केले.

महामित्र दत्ता वायचळे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.प्रा.शरद शेजवळ प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.सुनील कुर्हे,राजेंद्र दिवे,प्रा.के.एस.केवट,प्रा. जावेद शेख,माजी नगरसेवक श्रीकांत जाधव,अशोक घेगडमल,जमीर सय्यद अनिल वैद्य,कृष्णा सानप,कैलास गायकवाड,रंगनाथ मुसळे,नंदू सोनवणे,सागर भालेराव,भाऊसाहेब पवार,प्रकाश शिरसाट आदी मान्यवर उपस्थित होते. प्रारंभी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास व वामनदादा कर्डक यांच्या प्रतिमेस मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.कार्यक्रमाचे आयोजन महामित्र परिवार,लोककवी वामनदादा कर्डक प्रतिष्ठान नाशिक,अध्याक्रांतिकारक राघोजी ब्रिगेड संस्थेने केले होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुनील कुरे,सूत्रसंचालन सागर भालेराव व आभार जमील सय्यद यांनी मानले.कार्यक्रमास कामगार,कष्टकरी, शेतमजूर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
