
समर्थ ज्येष्ठ नागरिक संघटना आयोजित ‘चला कवितांच्या गावात…’ या विषयावरील व्याख्यानात बोलताना कवी रवींद्र मालुंजकर.
नाशिक:- विविध विडंबने, नव्याजुन्या विनोदी आणि आशयसंपन्न कविता यांची मेजवानी देणाऱ्या कवी रवींद्र मालुंजकर यांच्या अनोख्या शैलीतील सादरीकरणाने ज्येष्ठांना कविता-गाण्यांची सफर घडवली.

गंगापूररोडच्या प्रमोदनगर येथील समर्थ ज्येष्ठ नागरिक संघटनेच्या वतीने सुप्रसिद्ध कवी आणि सूत्रसंचालक रवींद्र मालुंजकर यांच्या ‘चला कवितांच्या गावात…’ या काव्य-व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. संघाचे अध्यक्ष विठ्ठलराव सावंत, किशोर कुलकर्णी, रामनाथ म्हसके, तुकाराम आहेर आदी मंचावर उपस्थित होते.
उत्तरोत्तर रंगत गेलेल्या व्याख्यानात कवी रवींद्र मालुंजकर यांनी सुरेल आवाजात लोकप्रिय गीते, विडंबन कविता, वात्रटिका, हास्यकविता, गझल, पोवाडा, लोकगीते अशा आशयसंपन्न रचनांसह अंतर्मुख करणाऱ्या कवितांचे सादरीकरण करत ज्येष्ठ नागरिकांना निखळ हास्यरसाची मेजवानी दिली. कार्यक्रमाला प्राचार्य रमेश देशमुख, प्रा.डॉ.बी.व्ही.कापडणीस, कवी वाळू आहेर, एकनाथ पवार, नामदेव कासार यांसह कार्यकारिणी सदस्य आणि उपस्थित ज्येष्ठ नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला आणि संपूर्ण वातावरण आनंदमय झाले. जुलै महिन्यात वाढदिवस असणाऱ्या सभासदांचा पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
रामनाथ म्हसके यांनी व्याख्यात्यांचा परिचय करून दिला. किशोर कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले. विठ्ठलराव सावंत यांनी आभार मानले.
