
*नाशिक:-(प्रतिनिधी )शरद कला क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठान पुणे आयोजित ‘राष्ट्रीय काव्यलेखन स्पर्धेत’ नाशिक येथील कवी व अभिनेते राजेंद्र उगले यांच्या कवितेला प्रथम क्रमांकाचे (विभागून) रुपये दहा हजाराचे पारितोषिक जाहीर झाले आहे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिल्याबद्दल केंद्र सरकार, राज्यसरकार, लोकप्रतिनिधी, महामहिम राष्ट्रपती, पंतप्रधान , साहित्य अकॅदमी आणि यासाठी नियुक्त केलेल्या साहित्यिक रंगनाथ पठारे समिती इत्यादींचे कवितेतून आभार मानणे असा आगळावेगळा विषय कवितेसाठी देण्यात आला होता. आभार मानतानाच मराठी भाषेचा उगम सांगून तिचे महत्व अधोरेखित करायचे होते.यास्पर्धेसाठी आलेल्या सुमारे पाचशे कवितेतून नाशिकच्या राजेंद्र उगले यांची कविता प्रथम क्रमांकाची मानकरी ठरली. विशेष म्हणजे यापूर्वी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी महामहिम राष्ट्रपती यांना कवितेतून विनंती करण्याची स्पर्धा घेण्यात आली होती त्यातही राजेंद्र उगले यांच्याच कवितेला प्रथम क्रमांकाचे रुपये दहा हजारांचे पारितोषिक प्राप्त झाले होते. राजेंद्र उगले यांच्या या यशाबद्दल नाशिकच्या साहित्य वर्तुळातून आनंद व्यक्त करण्यात येत असून सर्वत्र अभिनंदन केले जात आहे. राजेंद्र उगले यांनी याबद्दल शरद कला क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठान पुणे यांचे पदाधिकारी लक्ष्मीकांत खाबिया, अश्विनी पाचारणे, संदीप राक्षे, विवेक थिटे आणि परीक्षकांचे आभार मानले आहे.
