
नाशिक:-( प्रतिनिधी )नाशिक ही साहित्यिक, शाहीर, कलाकारांची भूमी आहे. नाशिकने आजवर चांगले कवी, लेखक, नाटककार, अभिनेते, चित्रकार, वादक, गायक महाराष्ट्राला दिले आहेत. या सर्वांसाठी काम करणाऱ्या वेगवेगळ्या संस्था कार्यरत आहे त्यात पंचवटी ललित कला मंडळ नव्याने आज स्थापन झाले असून या सगळ्या कलांचा संगम या मंडळाने करून घेतला आहे. नवोदित कलाकारांच्या पाठीवर थाप देऊन त्यांना लढा म्हणण्याची ताकद जुन्या-जाणत्यांनी द्यायला हवी त्याअर्थाने पंचवटी ललित कला मंडळाने काम करावे व सर्व कलांसाठी सर्वव्यापी भूमिका घ्यावी व मंडळ ती घेईल याची मला मंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांकडे पाहून खात्री वाटते असे प्रतिपादन माजी आमदार व ज्येष्ठ कवी नानासाहेब बोरस्ते यांनी केले. ते मु. शं. औरंगाबादकर सभागृहात पंचवटी ललित कला मंडळाच्या बोध चिन्ह अनावरण व यानिमित्ताने घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय बक्षीस वितरण समारंभात बोलत होते.

बोरस्ते पुढे म्हणाले की, या कलाकारांना वर्षभर व्यासपीठ उपलब्ध होईल यासाठी कार्यक्रम राबवावा व त्यासाठी आमच्यासारख्या ज्येष्ठांची काही मदत लागली तर ती आनंदाने सांगावी असे आवाहन करतो. याच कार्यक्रमात ज्येष्ठ नाट्य व्यावसायिक व सावाना पदाधिकारी जयप्रकाश जातेगावकर यांनी सांगितले की, मंडळाने नाट्य शिबिरे, कवितेची कार्यशाळा, नृत्य, गायन, वादन या कलांच्या विकसनासाठी दीर्घकालीन नियोजन करावे. ज्येष्ठ साहित्यिक पुंजाजी मालुंजकर, गिरणा गौरव प्रतिष्ठान चे अध्यक्ष सुरेश पवार, सावना पदाधिकारी सोमनाथ मुठाळ यांनीही शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मंडळाचे सचिव प्राचार्य राजेश्वर शेळके यांनी केले. अध्यक्ष अरुण इंगळे यांनी मंडळाची भूमिका आपल्या भाषणातून बोलून दाखविली तर मंडळ पदाधिकारी राहुल सोनवणे यांनी मंडळाची आखणी याविषयी भाष्य केले. शिक्षक नेते रमेश गोहिल यांनी मंडळाने शिक्षकांसाठीही उद्बोधन शिबीर राबवावे असे आवाहन केले. मंडळाने घेतलेल्या राज्यस्तरीय स्पर्धांचे रोख बक्षीस, प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह मान्यवरांच्या हस्ते वितरित करण्यात आले. यात काव्य लेखन स्पर्धेत जयश्री वाघ- प्रथम, रतन पिंगट आणि गंगा गवळी- द्वितीय तर सचिन सताळकर यांना तृतीय क्रमांकाचे बक्षीस देण्यात आले. गायन स्पर्धेत अमोघी कुलकर्णी यांनी प्रथम तर सृष्टी यादव आणि संजय परमसागर यांना अनुक्रमे द्वितीय आणि तृतीय क्रमांकाचे बक्षीस देण्यात आले. सोलो वादनात कुणाल गवळी अव्वल ठरला असून त्याच्या माऊथ ऑर्गन वादनाला प्रथम, इशिता गाडे हिला द्वितीय तर परभणीवरून आलेल्या शुभम सुकळे याच्या संबळ वादनाला तृतीय क्रमांक देण्यात आला. नृत्य स्पर्धेत वेदांत साळवी, आकांक्षा दिवेकर , सुरेख मैड यांना अनुक्रमे प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकाने गौरविण्यात आले. एकपात्री स्पर्धेत प्रांजल सोनवणे हिने प्रथम क्रमांक पटकावला असून सुनेत्रा दिढे यांना द्वितीय तर कल्पना गवरे आणि भूषण सोनवणे यांनी तृतीय क्रमांक विभागून देण्यात आला.या स्पर्धांचे परीक्षक म्हणून विवेक उगलमुगले, हेमंत कुलकर्णी, स्मिता जोशी , निकिता बर्वे-सोनार, ओमकार वैरागाकर, राहुल गायकवाड यांनी काम पाहिले.सर्व स्पर्धेतील प्रथम क्रमांकाचे याप्रसंगी सादरीकरण करण्यात आले. मंडळाचे प्रसिद्धी प्रमुख राजेंद्र उगले यांनी सूत्रसंचालन केले तर आभार गोरख पालवे यांनी मानले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मंडळाचे अभिजित वैद्य, पंकज गवळी, प्रकाश बर्वे, रोहित कानडे, चेतन बर्वे, सोमनाथ मुर्तडक, प्रवीण जाधव, समीर शिंदे, अनिल सूर्यवंशी यांनी परिश्रम घेतले.सभासद कल्याणी वाशिकर यांनी स्वागत गीताने कार्यक्रमाची सुरुवात केली होती.
