
✍️ शब्दांकन – प्रा. अमोल श्रीकृष्ण अहिरे, नाशिक
१८९५ मध्ये पहिले रंगीत व्यंगचित्र द यलो कीड प्रकाशित झाले होते. त्याची आठवण आणि व्यंगचित्रकलेचा गौरव म्हणून ५ मे हा जागतिक व्यंगचित्रकार दिन म्हणून जगभर साजरा करण्यात येतो. जगभरात व्यंगचित्र आणि व्यंगचित्रकारांना मानचे स्थान आहे. अनेकदा शब्दांमधून मांडण्याचा प्रयत्न करुनही ज्या गोष्टी व्यक्त होत नाहीत, अशा गोष्टी एका व्यंगचित्रातून सहजपणे मांडता येतात. कारण, चित्राच्या एका रेषेत हजारो शब्दांचा ऐवज सामावलेला असतो. व्यंगचित्र हा वर्तमानपत्राचा तर आत्मा आहे, अविभाज्य घटक आहे. भारतीय समाजावरही व्यंगचित्राचा फार मोठा प्रभाव पडलेला आहे. व्यंगचित्रकार या पेशाला आर.के. लक्ष्मण व बाळासाहेब ठाकरे यांनी ओळखच नव्हे, तर प्रतिष्ठा मिळवून दिली. स्वातंत्र्यपूर्व काळात वृत्तपत्रासोबतच व्यंगचित्राचाही भारतीय समाजात उगम झाला. चित्रकला हा व्यंगचित्राचा पाया आहे आणि व्यंगचित्र ही चित्रकलेची शेवटची पायरी आहे. असे असले तरीही ही अखेरची पायरीच कलावंताची खरी कसोटी घेणारी आहे. चित्रकलेसाठी अभ्यासक्रम असला तरीही व्यंगचित्रकारितेसाठी अभ्यासक्रम नाही. व्यंगचित्रकार हा कलावंत असतो. चाणाक्षपणा, उपजत विनोदबुध्दी, परिस्थियतीचे अवलोकन करुन त्यातील विसंगती आणि सुसंगती शोधण्याची क्षमता, त्यावर चपखलपणे कमीत कमी शब्दांत लक्षवेधी रेषांच्या साहाय्याने भाष्य करण्यायची हातोटी हे गुण व्यंगचित्रकारात असतात. व्यक्तिगत जीवनात तो मितभाषी असेल अथवा बोलघेवडा असेल, पण व्यंंगचित्रकार म्हणून आवश्यक गुण असल्याशिवाय तो यशस्वी होऊच शकत नाही. अनेक मराठी व्यंगचित्रकारांकडे चित्रकलेचे प्राथमिक शिक्षण नसतांनाही त्यांना हे दैवी वरदान लाभलेले दिसते. म्हणूनच व्यंगचित्रातील आशयाला समृध्द करणारी मिश्किाल शब्दरचना वापरणारे व्यंगचित्रकार स्वत:ची एक शैली निर्माण करण्यात यशस्वी झालेले दिसतात. व्यंगचित्र हा एक साहित्यप्रकार म्हटले जाते. इतर साहित्यामधून जसे जीवनदर्शन होते, तसेच व्यंगचित्रांतूनही होते. मात्र ते टिपण्यासाठी वेगळी नजर आणि रेखाटण्यासाठी वेगळा हात लागतो. व्यंगचित्रातून आलेल्या चटकदार, चमकदार कल्पना केवळ हास्यनिर्मितीसाठी आलेल्या नसतात, त्यामागे व्यंगचित्रकाराचा गहन अभ्यास, सखोल चिंता असते. जीवनपध्दतीवर एका वेगळ्या दृष्टिकोनातून भाष्य केलेले असते, वेगळ्या कोनातून प्रकाश टाकलेला असतो. व्यंगचित्रकार हा स्वत:शीही संवाद साधणारा असतो. आत्मपरीक्षण करणारा असतो. समाजात वावरत असतांना, आजू-बाजूला घडणाऱ्या घटनांचा अन्वययार्थ लावत असतो. अंतर्मुख होऊन विचार करतो आणि कल्पनाशक्ती, विनोदबुध्दी यांची जोड देऊन व्यंगचित्र रेखाटतो. त्यातील उपहास काहींना झोंबणारा असू शकतो. मात्र ही व्यंगचित्रे कालजेयी असू शकतात. ★ भारतातील काही सुप्रसिध्द व्यंगचित्रकारांबद्दल माहीती जाणून घेऊ या…. १) आर के लक्ष्मण – ‘कॉमन मॅन’ सुप्रसिद्ध ज्येष्ठ व्यंगचित्रकार रासीपुरम कृष्णस्वामी लक्ष्मण यांना आर. के. लक्ष्मण याच नावाने सर्वजण ओळखतात. टाईम्स ऑफ इंडियामधील “यू सेड इट” नावाने फक्त व्यंगचित्र असलेले सुरु केलेल सदर आणि “कॉमन मॅन”ने त्यांना अजरामर केले.२) शंकर – यांचा जन्म ३१ जुलै १९०२ मध्ये केरळमधील कायामकुलम येथे झाला. त्यांना भारतीय व्यंगचित्रकारांचे पितामह म्हटले जाते. पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरु यांच्या आवडत्या व्यंगचित्रकारांमध्ये शंकर यांचा पहिला क्रमांक होता. जेव्हा ते जवाहरलाल नेहरुंचे व्यंगचित्र काढत तेव्हा, नेहरु खुल्या मनाने त्याची स्तुती करत असत. ३) बाळासाहेब ठाकरे – २३ जानेवारी १९२६ ला बाळासाहेबांचा जन्म झाला. बाळासाहेबांनी शिवसेना पक्षाची स्थापना केली. मात्र राजकारणात येण्याअगोदर बाळासाहेब फ्री प्रेस जर्नलमध्ये आर. के. लक्ष्मण यांच्यासोबत काम करत होते. १९६० मध्ये बाळासाहेबांनी “मार्मिक” नावाचे स्वत:चे व्यंगचित्रात्मक साप्ताहिक सुरु केले होते. ४) बी वी राममूर्ती – दक्षिण भारतातील पॉकेट कार्टूनचे जनक म्हणून त्यांना ओळखले जाते. अमेरिकेचे पूर्व राष्ट्राध्यक्ष जिमी कार्टर यांच्यावर बनवण्यात आलेल्या व्यंगचित्राला “ग्रीन ऑफ द इअर” पुरस्काराने त्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख मिळवून दिली.५) मारिओ मिरांडा – यांना दक्षिण मुंबईतील उच्चभ्रू सोसाटींमधील जीवन तसेच गोव्यातील जीवनशैली व्यंगचित्रांद्वारे जिवंत करण्यासाठी ओळखले जाते. मारिओ मिरांडाची टाक आणि शाईने काढलेली चित्रे एकदम वेगळी आणि नजरेत भरणारी होती. ६) सुधीर तैलंग – २६ फेब्रुवारी १९६० मध्ये बिकानेरमध्ये जन्मलेल्या सुधीर तैलंग हिंदी व्यंगचित्र जगतातील एक मोठे नाव आहे.७) वी टी थॉमस – केरळमध्ये ४० वर्ष घरातील छोट्यांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांच्या ह्रदयावर त्यांनी राज्य केले होते. ८) एन के रंगनाथन उर्फ रंगा – जगभरातील सेलिब्रेटीजचे स्वाक्षरी असणाऱ्या व्यंगचित्रांचा रेकॉर्ड केला असल्याने लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नाव नोंद असलेले एन के रंगनाथन यांना रंगा या नावानेदेखील ओळखलं जातं. आश्चर्याची गोष्ट म्हणजे एन के रंगनाथन यांनी जास्त व्यंगचित्र आकाशवाणीमध्ये मुलाखतीदरम्यान काढली आहेत.९) माया कामथ – पुरुषांचे वर्चस्व असणाऱ्या या क्षेत्रात माया कामत यांचे नावदेखील सन्मानपूर्वक घेतले जाते. १०) हरीश चंद्र शुक्ला उर्फ खाक – यांनी हिंदी वृत्तपत्र जनसत्ता, नवभात टाइम्स, दैनिक जागरण, राजस्थान पत्रिका यांच्या माध्यमातून आपली व्यंगचित्र लोकांपर्यंत पोहोचवलीत.★ व्यंगचित्रातून मिळणारा आनंद हा माणसाला त्याचे दु:ख क्षणभर का होईना विसरायला भाग पाडतो. म्हणूनच जीवनानंद देणार्या या व्यंगचित्रक्षेत्रातील सर्व मुशाफिरांना मानाचा मुजरा…..
