
.सिन्नर (प्रतिनिधी)बाराव्या शतकात महात्मा बसवेश्र्वरांनी सामाजिक परिवर्तन करून समाजात संसदीय लोकशाहीची मूल्ये रुजविली असे प्रतिपादन शिवव्याख्याते प्रा.जावेद शेख यांनी केले. येथील विजयनगर मधील महात्मा बसवेश्वर चौकात महात्मा बसवेश्वर जयंती निमित्ताने महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.सिन्नर तालुका वीरशैव लिंगायत समाज, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती सिन्नर तसेच महामित्र परिवारातर्फे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी बोलताना प्रा.शेख यांनी महात्मा बसवेश्र्वरांनी स्वातंत्र्य, समता,बंधुता,न्याय यांचा पुरस्कार करून समाजातील वर्णभेद, अंधश्रद्धा,अस्पृश्यता,जातीभेद, स्त्री पुरुष असमानता, कर्मकांड नाहीसे करण्यासाठी लढा दिला.मानवता हाच खरा धर्म आहे,दया धर्माचे मूळ आहे अशी शिकवण दिली. संविधान लिहिण्याची प्रेरणा डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना महात्मा बसवेश्वर यांच्याकडून मिळाल्याचे प्रा.शेख यांनी सांगितले. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जिल्हा उपाध्यक्ष डॉ.श्यामसुंदर झळके यांनी प्रास्ताविकात महात्मा बसवेश्र्वरांनी श्रम हीच पूजा असून श्रम प्रतिष्ठेला महत्व दिले. त्यांचे कार्य आजच्या तरुण पिढीला प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन केले तर महामित्र दत्ता वायचळे यांनी आज राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची जयंती असल्याने त्यांना अभिवादन करून, त्यांच्या जीवनावर प्रकाश टाकला.राष्ट्रसंत तुकडोजी महाराज तसेच महात्मा बसवेश्वर यांच्या विचारांची आज गरज असून समाजाच्या उद्धारासाठी या महापुरुषांनी आपले जीवन समर्पित केले असे सांगितले. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे तालुका अध्यक्ष हरिभाऊ तांबे यांनी महात्मा बसवेश्वरांनी बाराव्या शतकात आंतरजातीय विवाह करून मोठी क्रांती केली. महिलांना समाजात सन्मान तसेच दुर्लक्षित,शोषित घटकांना समाजात प्रतिष्ठा मिळवून देण्याचे काम महात्मा बसवेश्र्वरांनी केले असे प्रतिपादन केले.प्रा.अरुण पोटे यांनी महात्मा बसवेश्वर व राष्ट्रसंत तुकडोजी महारांच्या कार्याबद्दल माहिती दिली. यावेळी अंनिसचे कार्याध्यक्ष सुकदेव वाघ, पदाधिकारी बापू चतुर, बस्तीराम कुंदे, डॉ.जी. एल.पवार,भाऊसाहेब पवार,मुकुंद वाळेकर,राहुल घोंगाणे,श्रीनिवास,आष्टुरे,श्लोक आष्टुरे, माणिक भंडारी,विजय गवंडर, शिवसांब बोरीकर,सुनील कुऱ्हे आदी उपस्थित होते. अविनाश आष्टुरे यांनी आभार मानले.
