
नाशिक:(प्रतिनिधी ) -दैनंदिन व्यवहारात घडणाऱ्या घटना आणि प्रसंग अनुभवत मानवी मन विविध भावनांतून व्यक्त होत असते. मनातील हेच भाव शब्द आणि स्वरातून प्रकट होतात, असे प्रतिपादन कवी प्रा.रोहित निकम यांनी केले. गिरणा गौरव प्रतिष्ठानच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त हुतात्मा स्मारकात आयोजित ‘पुस्तकावर बोलू काही’ या उपक्रमात ‘स्वरांचा पारिजात’ या पुस्तकावर ते बोलत होते. अध्यक्षस्थानी ॲड.मिलिंद चिंधडे होते. प्रा.निकम पुढे म्हणाले की, मानवी जीवन विविध भावनांनी गुरफटलेले असते. त्यामुळे भावनांचा गुंता वाढत जातो. यासाठी भावना व्यक्त होणाऱ्या शब्दांची गरज असते आणि स्वरांचाही स्पर्श व्हावा लागतो. भावना कोणत्याही असोत; आईच्या भावना, निसर्गाच्या भावना, नातेवाईकांच्या भावना जपत असताना माणसाला विविध पातळीवर कसरत करावी लागते. त्यातूनच या संग्रहातील कवितांचा जन्म झाला, असे ते म्हणाले. शिवाजी निकम आणि करिश्मा निकम या भाग्यवान विजेत्यांना ग्रंथभेट देण्यात आली. सुरेश पवार यांनी सूत्रसंचालन केले. दतात्रय कोठावदे यांनी आभार मानले. दरम्यान येत्या शुक्रवारी (दि.२) सटाणा येथील किरण दशमुखे हे ‘मार्निग वॉक’ या पुस्तकावर ऐसपैस गप्पा करणार आहेत.
