
नांदगाव, नाशिक (२५ एप्रिल २०२५) — महिला उद्योजकतेला चालना देण्यासाठी आणि त्यांच्या व्यवसायिक क्षमतांचा विकास साधण्यासाठी “संवेदनशीलता आणि क्षमता विकास कार्यशाळा”चे आयोजन करण्यात आले. MSME क्षेत्राची उत्पादकता वाढविणे व गती देणे (RAMP) प्रकल्पाच्या अंतर्गत ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.या कार्यशाळेचे आयोजन नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर मायक्रो, स्मॉल अँड मिडीयम एंटरप्रायजेस हैदराबाद व महाराष्ट्र स्टेट इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कार्पोरेशन यांच्या सहकार्याने करण्यात आले. स्थानिक स्तरावर लोकराज्य समाज विकास व संशोधन संस्था, छत्रपती संभाजी नगर व आधार बहुउद्देशीय विकास संस्था, नांदगाव, नाशिक यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले.

.या कार्यशाळेत एकूण ५० महिला उद्योजकांनी सहभाग घेतला. महिलांना व्यवसाय सुरू करण्यासाठी आवश्यक असलेले मूलभूत ज्ञान, व्यवस्थापन कौशल्ये, आर्थिक नियोजन, बाजारपेठेचा अभ्यास, ब्रँडिंग व ग्राहक संबंध व्यवस्थापन अशा विविध विषयांवर सखोल मार्गदर्शन करण्यात आले.प्रशिक्षक म्हणून ऍड. विजय जाधव, ऍड. विद्या कसबे, प्रतिभा शिंदे, आणि प्राचार्य निकुंभ (ITI कॉलेज, नांदगाव) यांनी उपस्थित राहून महिलांना सैद्धांतिक व प्रात्यक्षिक ज्ञान दिले. प्रशिक्षणादरम्यान सहभागींना त्यांच्या व्यावसायिक अडचणींचे निरसन करण्यासाठी सल्ला दिला गेला आणि त्यांना व्यवसाय वृद्धीची रणनीती तयार करण्यास मार्गदर्शन केले गेले.कार्यक्रमाचे उद्घाटन अंजुमताई कांदे यांच्या हस्ते संपन्न झाले. आपल्या उद्घाटनपर भाषणात त्यांनी महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणावर भर दिला.

त्यांनी सांगितले की, महिलांनी स्वावलंबी होण्यासाठी आणि समाजात आर्थिक स्थैर्य निर्माण करण्यासाठी उद्योजकतेच्या संधींचा लाभ घ्यावा. त्यांनी अशा प्रशिक्षण कार्यशाळांचे महत्त्व अधोरेखित करत आयोजकांचे अभिनंदन केले.कार्यक्रमात हरी मोहन गौतम, निसबीड, नवी दिल्ली यांनी प्रमुख मार्गदर्शक म्हणून महिलांना उद्योग व्यवसायाच्या संधी, MSME धोरणे आणि प्रोत्साहन याविषयी सखोल माहिती दिली. त्यांनी महिलांना आपल्या उद्योजकीय प्रवासासाठी नवे दृष्टिकोन व प्रेरणा दिली.कार्यक्रमादरम्यान महिलांना प्रोत्साहन देण्यासाठी विविध प्रेरणादायी कथा आणि यशोगाथा देखील सादर करण्यात आल्या. कार्यशाळेच्या अखेरीस सहभागी महिलांना प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.या उपक्रमामुळे ग्रामीण व निमशहरी भागातील महिलांमध्ये व्यवसाय सुरू करण्याचा आत्मविश्वास वाढला असून, त्यांच्या आर्थिक स्वावलंबनाच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल टाकले गेले आहे. सहभागी महिलांनी कार्यशाळेच्या आयोजनाबद्दल समाधान व्यक्त केले आणि भविष्यात अशा आणखी उपक्रमांची अपेक्षा व्यक्त केली.ही कार्यशाळा ग्रामीण भागातील महिलांच्या उद्योजकतेच्या प्रवासाला बळकट करणारी आणि MSME क्षेत्रातील महिलांचा सहभाग वाढवणारी ठरली आहे.
