
अमरावती (प्रतिनिधी) : मस्जिदीत जाताना कीर्तनकारांना आणि मंदिरात जाताना मौलानांना भिती वाटू नये. मशिदीत संत साहित्यावर कीर्तन व्हावे आणि मंदिरात कुराणावर तकरिर व्हावी. (मशिदीत मौलाना मार्गदर्शन करतात त्याला तकरिर म्हणतात). त्यातून हिंदू-मुस्लीम यांच्यात एकमेकांच्या धर्माबद्दल असणारे गैरसमज दूर होतील आणि सामाजिक सद्भावनेचा मार्ग प्रशस्त होईल, असे मत ह.भ.प. शामसुंदर महाराज सोन्नर यांनी अमरावती येथील मशिदीत प्रवचन करताना व्यक्त केले.अमरावती येथील मस्जिद तौहीद येथे जमाते इस्लाम ए हिंदच्या वतीने सामाजिक सद्भावना संमेलन आयोजित केले होते. त्यात शामसुंदर महाराज सोन्नर यांचे प्रवचन झाले. यावेळी मस्जिदचे इमाम हाफ़िज़ अब्दुल क़ादिर अंसारी यांच्यासह रफ़ीक़ अहमद खान, अज़मत उल्लाह खान, जावेद उल्लाह खान, प्रा. डाॅ. कल्याणकर, आशिष कडू, श्रीकांत बाबूळकर, प्रवीण सदार, खलील, रफिक खान, प्रदीप पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी बोलताना शामसुंदर महाराज सोन्नर पुढे म्हणाले की, धर्माची निर्मिती मानवी जीवनाला आचारसंहिता असावी म्हणून झाली. माणसाचे जगणे सुसह्य व्हावी ही त्या मागची भूमिका असावी. मात्र आज धर्मा धर्मात संघर्ष निर्माण होत आहेत. ज्यातून समाज एक संघ राहण्या ऐवजी दुभंगला जात आहेत. काही लोक आपल्या राजकीय स्वार्थासाठी धार्मिक तेढ वाढविण्यासाठी प्रयत्न करीत आहेत, अशा वळी हिंदू आणि मुस्लिम धर्मातील जाणत्या लोकांनी एकत्र येऊन सामाजिक सद्भावना वाढविण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. जमाते इस्लाम ए हिंदच्या वतीने आयोजित केले जाणारे सद्भावना संमेलन ही दरी कमी करतील, असा विश्वास शामसुंदर महाराज सोन्नर यांनी व्यक्त केला.यावेळी समारोप करताना मस्जिदचे इमाम हाफिज अब्दुल कादीर अन्सारी म्हणाले की, इस्लामबाबत सध्या जाणीवपूर्वक गैरसमज पसरविले जात आहेत. कुराणमध्येही आमन शांतीचाच संदेश दिलेला. हा शांतीचा संदेश लोकांपर्यंत पोहचला तर दोन्ही धर्मात असलेले गैरसमज दूर होतील, त्यासाठी आपण मिळून प्रयत्न करूया, असे आवाहन त्यांनी केले..
