
नाशिक:-( प्रतिनिधी ) प्रत्येकाचे आयुष्य हे सुख आणि दुःख यातून घडत असतं. प्रत्येक माणसाला जगण्यासाठी प्रतिकूल परिस्थितीचा सामना करावाच लागतो. तेव्हाच जगण्याच्या वाटा सापडतात, असे प्रतिपादन प्रा.डॉ.सुरेश पाटील यांनी केले. गिरणा गौरव प्रतिष्ठानच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त हुतात्मा स्मारकात ‘पुस्तकावर बोलू काही’ उपक्रमात ‘हिवर’ या पुस्तकावर ते बोलत होते. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक अलका दराडे होत्या. डॉ.पाटील म्हणाले की, जग खूप सुंदर आहे. ते सुंदर बनवण्यासाठी आपण कष्ट करण्याची जिद्द ठेवली तर निश्चितच ते अधिक समृद्ध करण्याचं बळ आपल्याला मिळतं. हिवर या झाडाला काटे असले तरी त्या काट्यातून हे झाड स्वतःचा बचाव करत जगण्याची लढाई करत असते. म्हणूनच प्रत्येक माणसाचे आयुष्य हे हिवर या झाडासारखे असते. त्यातून मार्ग काढत जबाबदाऱ्या डोळ्यासमोर ठेवल्या तर माणसाचे आयुष्य समृद्ध झाल्याशिवाय राहणार नाही. त्यासाठी संघर्ष या शब्दाची आपण बांधिलकी ठेवणे गरजेचे आहे. ज्या भूमीत आपण जन्माला आलो; त्या भूमीचे ऋणही आपल्यावर असते, असेही ते म्हणाले. दादा पठाडे आणि अशोक भदाणे या भाग्यवान विजेत्यांना ग्रंथभेट देऊन सन्मानित करण्यात आले.मधुकर गिरी यांनी सूत्रसंचालन केले तर संजय आहेर यांनी आभार मानले. दरम्यान शुक्रवारी (दि.२५) ज्येष्ठ पत्रकार मुकुंद बाविस्कर हे ‘तुकडोजी महाराज’ या पुस्तकावर ऐसपैस गप्पा करणार आहेत.
