
नाशिक:( प्रतिनिधी )स्वातंत्र्यपूर्व काळात आर्थिक परिस्थिती जेमतेम होती. शिवाय शिक्षण सर्वदूर पोहोचले नव्हते. ग्रंथदेखील मर्यादित आणि शिक्षित लोकांकडेच होते. त्यामुळे जनतेची ज्ञानाची भूक भागविण्यासाठी श्रवणभक्ती हाच पर्याय होता. त्यातूनच नाशिकच्या ऐतिहासिक वसंत व्याख्यानमालेचा शुभारंभ झाला. प्रामाणिक कार्यकर्त्यांचे पाठबळ आणि समाजाच्या गरजा लक्षात घेऊन नवीन काळाशी जुळवून घेतल्याने ही व्याख्यानमाला नाशिकच्या सांस्कृतिक इतिहासातील सोनेरी पान झाले आहे, असे प्रतिपादन नाशिक वसंत व्याख्यानमालेचे अध्यक्ष श्रीकांत बेणी यांनी केले. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या नाशिकरोड शाखेतर्फे संवाद सृजनाशी मालिकेच्या दुसऱ्या पर्वातील २३ वे पुष्प श्रीकांत बेणी यांनी गुंफले. नाशिकरोडच्या दत्त मंदिर चौकातील ऋतुरंग भवनमध्ये झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी नगरसेवक प्रा. शरद मोरे होते. त्यांनी स्मृतिचिन्ह व ग्रंथभेट देऊन बेणी यांचे स्वागत केले. श्रीकांत बेणी म्हणाले, की वसंत व्याख्यानमालेत बदलत्या सामाजिक जाणिवांचा आढावा घेतला जातो. त्यासाठी देश-विदेशातील वक्ते आपले विचार मांडतात. त्यातून नाशिककरांची ज्ञानाची भूक भागविण्याचे, समाजजागृतीचे कार्य केले जाते. अनेकांच्या पाठबळावर या व्याख्यानमालेची वाटचाल अखंडपणे सुरू आहे. व्याख्यानमालेच्या शताब्दीनिमित्ताने सन २०२३ मध्ये वसंत व्याख्यानमाला विशेषांकाचा जन्म झाला. १९२२ ते २०२३ पर्यंत व्याख्यानमालेला येऊन गेलेल्या व्याख्यात्यांची माहिती, त्यांचे विचार, दानशूर, कार्यकर्ते, कार्यकारिणी यांची माहिती त्यात प्रसिद्ध केली आहे. पूर्वी ग्रंथ हे मोजक्या विचारवंतांकडे असायचे. आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने सामान्यांकडे ग्रंथ घेण्याइतके पैसेही नसायचे. त्यामुळे श्रवणभक्ती हा सामान्यांपुढे पर्याय असायचा, असे ते म्हणाले. विलास गोडसे यांनी स्वागतकाव्य सादर केले. रेखा पाटील यांनी प्रास्ताविक केले. दशरथ लोखंडे यांनी परिचय करून दिला. योगेश कापडणीस यांनी आभार मानले. कांचन पवार यांनी पसायदान म्हटले. प्राचार्य अश्विनी दापोरकर यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमाला प्राचार्य संगीता बाफना, नांदगावचे माजी नगराध्यक्ष भास्कर कदम, प्रजापिता ब्रम्हकुमारीच्या गोदावरीदिदी, दिलीप बोरसे, राजेंद्र बाफणा, संगीता बेणी, ऋषिकेश डापसे, विजय काकड, रमेश औटे, गणपतराव मुठाळ, पांडुरंग चव्हाण, अलका अमृतकर, सुमन हिरे, रामचंद्र शिंदे, प्रशांत केंदळे, मधुकर सातपुते, डॉ. सुधीर ठोसर आदी उपस्थित होते.
