
अशांत भूमिकेचे अंतरंग: उध्वस्त परिस्थितीचा आढावा □ विलास अंभोरे, वाशीम
कवितेवर प्रेम करणारे पूर्वी होते, आताही आहेत. कवी पूर्वी होते, आताही आहेत. अनैसर्गिक, अवैज्ञानिक आणि नैसर्गिक, वैज्ञानिक मूल्यं पूर्वी होती, आताही आहेत. विशेष म्हणजे, आताशा कार्यक्षेत्र अधिकच विस्तारलेलं आहे. समाज माध्यमांचा आश्रय घेणाऱ्या कवींची संख्या मोठ्या प्रमाणात वाढलीय. मनाला भिडणाऱ्या, अस्वस्थ करणाऱ्या कविता फारशा वाचनात येत नाहीत. असं असलं तरीही एकूणच परिस्थिती पूर्णतः निराशावर्धक नाही. काही कवी आपल्या जगण्याभोगण्याला, अस्वस्थतेला शब्दबद्ध करतानाही दिसतात. मनाचा धीटपणा कायम ठेवून कलात्मकतेनं विद्रोहाचीही मांडणी करतात. नैसर्गिक आणि वैज्ञानिक मूल्यांचा अंगीकार करतात. मनुष्यद्रोही मूल्यं नाकारून मनुष्यत्वाची चांगल्या पद्धतीनं पेरणीही करतात. कवितेच्या क्षेत्रातली ही जमेची गोष्ट आहे. जे काही चांगले कवी आहेत, त्यात डाॅ. विजय जाधव यांच्या नावाचा समावेश करावा लागेल. डाॅ. जाधव यांचा एवढ्यातच ‘अशांत भूमिकेचे अंतरंग’ हा कवितासंग्रह प्रसिद्ध झालाय. दमदार म्हणता येईल असाच त्यांचा हा प्रवेश आहे. यापूर्वीही त्यांनी कथा, वैचारिक आणि चरित्रविषयक लेखन केलंय. हा कवितासंग्रह वैविध्यपूर्ण स्वरूपात जन्मास आलाय. दुःखं, अपेक्षाभंग, कमालीच्या हालअपेष्टा आणि आशावादाचीही बेमालूमपणे संग्रहात पेरणी झालेली आहे. अण्णा भाऊ साठे आणि वसंतराव नाईक ह्या महानायकांनाही कवीनं शब्दबद्ध केलंय. याडीवरही (आई) अर्थपूर्ण कविता आहे. याशिवाय वेगवेगळ्या विषयांवरच्या कविता संग्रहात बघायला मिळतात. कवीचा पिंडच हा गंभीर असल्यामुळे टवाळखोरी आणि नगण्य विषयांपासून कविता दूरच राहिलेल्या आहेत. हा एकूणच संग्रह डाॅ. जाधव यांना दमदार कवी म्हणून ओळख करून देण्यात कमी पडत नाही. आपल्या मनोगतात डाॅ. जाधव म्हणतात, ‘अर्थपूर्ण ती कविता, अर्थहीन ती अकविता. जगाला प्रतिभावंतांनी अधिक उंचीवर नेऊन पोहोचविलेलं आहे, याकडं दुर्लक्ष करणं म्हणजे स्वतःशी प्रतारणा केल्यासारखं होईल. मनुष्य हा कळत वा नकळतपणे कविता जगत असतो म्हणूनच त्याच्या जीवनात सौंदर्य फुलारून येत असते.’ (पृ. तेरा) यावरूनही कवीला कवितेविषयी चांगली जाण आहे हे लक्षात येते. अशी जाण असल्याशिवाय कुठलाही कवी कवितेची लांबी, रुंदी, खोली आणि उंची वाढवू शकत नाही. कवीचं मनोगत वाचकमनात कवितांविषयी उत्कंठा वाढविते… आणि डोळे एकेका ओळींवरून फिरायला लागतात. ‘विज्ञानवाणी’ ह्या पहिल्याच कवितेतून कवी खूप काही सांगून जातो… ‘होती बिकट वेळ तेव्हा मात्र मदतीला माणसांच्या विज्ञानच आले धावून… धरणं आणि हरितक्रांतीनं आणले परत हास्य जे गेले होते वाहून’ (पृ. १) पुढं याच कवितेत वैज्ञानिक मूल्य अधोरेखित करताना कवी म्हणतो, ‘नजर येईल फक्त विज्ञाननिष्ठ शिक्षणातून जगाला असेल तोच आधार… नवस, उपासतापास ही तर माणसांची दिशाभूल सत्यालाच जी देते नकार’ (पृ. ३) ह्या ओळी तांड्यातल्या दाहकतेला प्रभावीपणे समोर आणतात. कुठंही ओरड वा आक्रस्ताळेपणा नाही, कुठंही अतिशयोक्ती नाही. तशी ही कविता प्रातिनिधिक म्हणावी अशीच. तमाम वंचित, उपेक्षितांच्या प्रश्नांना हात घालणारी. जवळून बघावी, अनुभवावी अशी. मोजक्याच ओळी नजरेखाली घातल्या तरी परिस्थितीची भीषणता लगेच लक्षात येते… ‘पोटातल्या आगीचा मूक थयथयाट… सोबतीला आलीय थंडीची लाट तशात मोडलेली हाडं मी पुन्हा पुन्हा मोडतोय घरी फणफणतेय तापानं पत्नी मी चिंतेत जळतोय, कण्हतोय!!’ (काळोख तसाच होता/ पृ. ५) अन्यायकारक काळात लेखण्या श्रृंगारात गुंतून राहू नयेत. अशा काळात त्यांच्यावर अधिक जबाबदारी येऊन पडते. एक संवेदनशील कवी म्हणून याचं भान जाधव यांना आहे. केवळ मनोरंजन करणं हे लेखणीचं प्रयोजन असू शकत नाही, म्हणूनच ते म्हणतात… ‘देठांपासून कळ्या खुडाव्यात, पाखरांचे पंख अन् चालणाऱ्यांचे पाय छाटावेत आणि श्वासातला ऑक्सिजन हिरावून घ्यावा असं चालूच आहे अखंडपणे म्हणूनच फुटताहेत शब्द लेखणीला’ (शब्द/ पृ. ५१) वर्तमानात काय काय घडत चाललंय याचा आढावा इथं कवीनं घेतला आहे. प्रत्येक कडव्यात भीषणता आहे. अशा नोंदी घेणं कवीचं कर्तव्यही आहे. कुठं आग लागली तर कवी तिकडं दुर्लक्ष नाही करू शकत. दूर जरी कुठं आग लागली तरी त्या आगीत कवी जळत असतो, म्हणूनच नोंदी घेतल्याशिवाय, आपली माणूस म्हणून प्रतिक्रिया दिल्याशिवाय तो पुढं सरकू शकत नाही. इथं कवी व्यक्त होतो, ‘दररोज गावं भयभीत, शहरं भयभीत सुरक्षित नाही जंगल हात गेलेत सोडून दूर पण जात नाही दंगल’ (दररोज/ पृ. ११७) प्रस्तुत संग्रहात एकूण ६९ कविता आहेत. काही दीर्घ कविताही आहेत. परिणाम, सुंदर माणसांचा विकृत शोध, लेखणीवर अण्णा, संवाद वसंतरावांशी, उद्ध्वस्त अन्नदाते, बाप, रांगोळी, गुलमोहर, कुठलाच काटा, समाजसेवक अशा पुष्कळशा कविता ह्या लक्ष वेधून घेतात. त्या वाचकाला विचारप्रवृत्त करतात. त्या वेगळ्या अनुभवात घेऊन जातात. प्रा. नंदू वानखडे यांनी अतिशय अर्थपूर्ण आणि देखणं मुखपृष्ठ देऊन पुस्तकाचं मूल्य वाढविलेलं आहे. शिवाय ग्रंथाली ह्या नामांकित प्रकाशन संस्थेनं चांगली मांडणी करून पुस्तकाच्या मूल्यात अधिकच भर घातली आहे. संग्रही असावं असं हे पुस्तक आहे. डाॅ. जाधव यांचा दुसरा कवितासंग्रह अधिकच दमदार असेल अशी चिन्हं प्रस्तुत पुस्तकात दिसून येतात.
अशांत भूमिकेचे अंतरंग
_ डाॅ. विजय जाधव _ ग्रंथाली प्रकाशन, मुंबई – पृष्ठं: १७७ – मूल्य: ३००/ रुपये
