
भालूर (वार्ताहर) येथे दरवर्षी प्रमाणे साजरा होणारा शाकंबरी माता यात्रोत्सव यावर्षीही मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे.यावर्षी २० जानेवारी २०२५ रविवारी यात्रोत्सव साजरा करण्यात येणार आहे. यात्रोत्सवात सकाळी देवीला जलाभिषेक करण्यासाठी गावातील देवीचे भक्त कोपरगाव येथून कावडीने पायी चालत जल कुंभ घेऊन येतात. गोदावरीचे आणलेल्या जलकुंभाची गावातून सकाळी वाद्याच्या गजरात मिरवणूक काढण्यात येते त्यानंतर देवीला जलाभिषेक केला जातो.त्यानंतर दिवसभर भक्तांकडून देवीची नवसपूर्ती केली जाते.दिवसभर दर्शनासाठी भक्तांकडून गर्दी केली जाते.यावेळी विक्रेत्यांनी विविध प्रकारच्या दुकानांचे स्टॉल्स मंदिर परिसरात लावलेले असतात.सायंकाळी यात्रेचे मुख्य आकर्षण तकतराव मिरवणूक असते.त्यात तमाशा कलावंत मिरवणुकीत आपले नृत्य सादरीकरण करतात तर एका रथात मल्लांकडून विविध प्रकारच्या कसरती सादर केल्या जातात.त्यानंतर रात्री सुनंदा कोचुरे धुळेकर यांचा तमाशाचे आयोजन करण्यात आले असून दुसऱ्या दिवशी चार वाजता कुस्त्यांच्या दंगलीचे आयोजन करण्यात आलेले आहे.शाकंबरी मातेच्या दर्शनासाठी आणि कुस्त्यांच्या दंगलीसाठी मोठ्या संख्येने भाविकांनी हजेरी लावावी असे आवाहन यात्रा पंच कमेटीच्या वतीने करण्यात आले आहे.
