
नाशिक:- संस्काराची पायरी आज बहुधा ओळखली जात नाही. त्यामुळे समाजातील जाणिवा आणि संवेदना बोथट होत आहेत, असे विचार सुप्रसिद्ध साहित्यिक सुजाता येवले यांनी मांडले. गिरणा गौरव प्रतिष्ठानच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त हुतात्मा स्मारकात आयोजित ‘पुस्तकावर बोलू काही…’ या अभिनव उपक्रमात सुजाता येवले ‘एक्स्चेंज ऑफर’ या पुस्तकावर बोलत होत्या. अध्यक्षस्थानी मुक्ता चिंधडे होत्या. सुजाता येवले पुढे म्हणाल्या की, शहर आणि गाव यातील वातावरण बरेचसे विभिन्न असते. आज भारतीय कुटुंबव्यवस्था बदलली आहे. एकमेकाशी संवाद नसल्याने एकलकोंडेपणा वाढत चालला आहे. शहरातील चकचकीत दुनिया भुरळ घालते. पण शांतता-समाधान मिळत नाही. पैशाची हाव असणारा माणूस विश्वास गमावून बसतो आणि आत्महत्येचा प्रयत्न करतो. अशा विविध कथांचा समावेश असलेल्या या पुस्तकातून विविध पात्रं उभे केले आहे, असेही त्या म्हणाल्या.
अलका अमृतकर आणि माधुरी अमृतकर यांना ग्रंथभेट देऊन सन्मानित करण्यात आले. सुरेश पवार यांनी सूत्रसंचालन केले.
रंजना बोरा यांनी आभार मानले.
दरम्यान येत्या मंगळवारी (दि.२२) प्राचार्य डॉ.सुरेश पाटील ‘हिवर’ या पुस्तकावर ऐसपैस गप्पा करणार आहेत.
