
नाशिक दि. १४ (बातमीदार.). बदलापूर येथील वृत्तपत्र उल्हास प्रभात या वृत्तपत्राने आयोजित केलेल्या दिवाळी अंक स्पर्धेमध्ये नाशिक येथील ‘सुभाषित’ या विनोदी दिवाळी अंकाला उत्कृष्ट दिवाळी अंक पुरस्कार जाहीर झाला आहे. बदलापूर येथे दिनांक १८ एप्रिल रोजी होणाऱ्या समारंभात मान्यवरांच्या हस्ते या बक्षिसांचे वितरण होणार आहे.गेली चौदा वर्ष सुभाषित विनोदी दिवाळी अंक नाशिक येथून प्रकाशित होत असून नवोदित तसेच जुन्या जाणत्या विनोदी लेखकांना व्यासपीठ मिळवून देण्यासाठी सुभाषित दिवाळी अंक गेली सातत्याने प्रयत्न करत आहे. चौदा वर्षांमध्ये २५ पेक्षा जास्त पुरस्कार मिळालेला नाशिक मधील हा महत्त्वाचा दिवाळी अंक आहे.आमदार किसन कथोरे, परशुराम आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष कॅप्टन आशीष दामले, सकाळचे मुख्य संपादक राहुल गडपाले यांच्या प्रमुख उपस्थितीत या पुरस्कारांचे वितरण होणार असल्याची माहिती उल्हास प्रभात या वृत्तपत्राचे संपादक डॉक्टर गुरुनाथ बनोटे यांनी दिली आहे. सुभाषितच्या या यशाबद्दल संपादक सुभाष सबनीस यांचे नाशिक कवीचे अध्यक्ष बाळासाहेब मगर, भोसलाचे कार्याध्यक्ष ॲड.अविनाश भिडे, प्रकाशक संघाचे अध्यक्ष विलास पोतदार, मराठी पत्रकार संघाचे नरेंद्र पाटील, साहित्यिक विवेक उगलमुगले, रवींद्र मालुंजकर यांनी अभिनंदन केले आहे.
