
सिन्नर(प्रतिनिधी ) जवाहर नवोदय प्रवेश परीक्षेचा नुकताच निकाल जाहीर करण्यात आला. नाशिक जिल्ह्यात परीक्षेत एकूण पंधरा हजार चारशे वीस विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. त्यापैकी 80 विद्यार्थ्यांची इयत्ता सहावीसाठी गुणवत्तेवर आधारित मेरिट लिस्ट प्रसिद्ध करण्यात आली. अभिमानाची गोष्ट म्हणजे या यादीत जिल्हा परिषद मुसळगाव शाळेचे विद्यार्थी आर्यन चतुर व श्लोक शिरसाट यांची खेडगाव दिंडोरी येथील जवाहर नवोदय विद्यालयासाठी निवड झाली आहे.विद्यार्थ्यांना वर्गशिक्षक विकास गुंजाळ ,स्वाती येवले, जयश्री खर्जुल, आई, वडील यांचे उत्तम मार्गदर्शन लाभले.

शाळेच्या वेळे व्यतिरिक्त विद्यार्थ्यांना जादा तास घेऊन केलेले मार्गदर्शन व विद्यार्थ्यांच्या बौद्धिक शिक्षणासोबत शारीरिक शिक्षणावरही विशेष भर देण्यात आल्यामुळे विद्यार्थ्यांना हे यश संपादन करता आले. विकास गुंजाळ यांच्या चुटकीसरशी आकडेमोड करत अगदी अवघडात अवघड गणित ट्रिक वापरून सोडविण्याच्या क्लृप्त्यामुळे सर्वच विद्यार्थ्यांना फायदा झाला. शाळेचा विद्यार्थी आर्यन चतुर यांने यावर्षी जिल्हा परिषद अध्यक्ष चषक स्पर्धेत मॅथ बी, सी .एस. हाकॅथॉन यात अव्वल स्थान पटकावत जिल्हास्तरासाठी मजल मारली आहे .तसेच राज्यस्तरीय मंथन परीक्षेतही घवघवीत यश संपादन करून शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला. श्लोक शिरसाट यानेही विविध स्पर्धांमध्ये उत्तम कामगिरी बजावली आहे. शाळेतील विविध स्पर्धांसाठी नेहमीच मुख्याध्यापिका रंजना भालेराव यांनी वेळोवेळी मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांना व विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केले. शाळेतील सर्व शिक्षकांनी सहकार्य केले .सिन्नर तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी राजेंद्र डामसे मुसळगाव सरपंच, उपसरपंच, ग्रामस्थ, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष, सर्व सदस्य,विस्ताराधिकारी मंजुषा साळुंखे, कैलास सांगळे , विजय बागुल , केंद्रप्रमुख हेमंत भुजबळ आदीनी यशस्वी विद्यार्थ्यांचे , शिक्षकांचे अभिनंदन करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
