
पिंपरखेड ( प्रतिनिधी)- सोमवार दि. १४ एप्रिल २०२५ आज रोजी विद्यालयात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यालयाचे मुख्याध्यापक मा. काशिनाथ गवळी यांच्या हस्ते महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. प्रसंगी कु. कोमल जाधव, कु. प्रतीक्षा सोर, कुमार पुष्कर इंगळे, गौरव मोरे आदी विद्यार्थ्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांच्या जीवनावर आपले विचार व्यक्त केले. यावेळी उपशिक्षक उत्तम सोनवणे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना लहानपणापासून शिक्षणासाठी करावा लागणारा संघर्ष, भारतीय राज्यघटनेच्या निर्मितीसाठी घेतलेले कष्ट यांसह अनेक प्रसंगातून त्यांचा जीवनपट उलगडून दाखवला. विद्यालयाचे मुख्याध्यापक व कार्यक्रमाचे अध्यक्ष काशिनाथ गवळी यांनी यावेळी आजच्या काळात महापुरुषांच्या विचारांची गरज असल्याचे स्पष्ट केले. सर्वांनी महापुरुषांनी आपल्या उज्ज्वल भवितव्यासाठी घेतलेल्या कष्टाची जाणीव ठेवून देशासाठी, समाजासाठी त्यांनी केलेल्या सर्वोच्च त्यागाचे स्मरण ठेवून त्यांचे विचार आचरणात आणावेत व त्यांच्या स्वप्नातील विकसित भारत घडवण्यास हातभार लावावा असे नमूद केले. यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सांस्कृतिक कार्यक्रम प्रमुख व जेष्ठ शिक्षक संजय कांदळकर यांनी केले. अतिशय सुंदर फलकलेखन कलाशिक्षक लक्ष्मण जाधव यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अलका शिंदे, कैलास पठाडे, संदीप मवाळ, आबा सोनवणे यांनी विशेष परिश्रम घेतले. आभार निलेश चव्हाण यांनी मानले.
