
लेखक:- कविराज – प्रकाश निकाळे, विंचूर ,मो.नं. ८३८०८२४३८५.सोबत छायाचित्र .

आधुनिक भारतीय महिलांना सक्षम स्वातंत्र्य आणि स्वावलंबी करण्यासाठी अनेक समाज अंगानीकार्ये केले. स्त्रीमुक्ती चळवळीला संविधानात्मक रूप देऊन पूर्णत्वास घेऊन जाण्याचे कार्य डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केले. स्वातंत्र्यापूर्वी भारतीय स्त्रियांवर धर्म संस्कृती व पावित्र्याची जोड देऊन धर्म,जात, वंश, लिंगभेद व पितृसत्तेच्या कचाट्यात अडकलेल्या भारतीय महिलांना बाहेर काढण्याचे कार्य डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केले. बाबासाहेबांनी समतामूलक दृष्टिकोनातून स्त्रियांमध्ये परिवर्तन घडवण्यावर भर दिला. भारतीय हिंदू पुरुषप्रधान संस्कृतीतील स्त्री आणि अस्पृश्य समाजातील शूद्रातिशूद्र समजली जाणारी स्त्री या सर्वांच्या उद्धारासाठी त्यांनी कार्य केले.भारतीय राज्यघटनेने भारतीय स्त्रियांना मूलभूत हक्क व अधिकार बहाल करून माणूस म्हणून जगण्याचे स्वातंत्र्य दिले.भारतीय स्त्रीमुक्तीची खरी वैचारिक बैठक ही समतावादी तत्त्वावर आधारित असून मानवी कल्याण हाच केंद्रबिंदू आहे.समता व मानवतेच्या दृष्टिकोनातून स्त्रियांसाठी अनेक सामाजिक समस्यांवरती मौलिक उपाय बाबासाहेबांनी समाजास दिले.भगवान गौतम बुद्ध, छत्रपती शिवाजी महाराज, संत कबीर, संत रोहिदास, राजर्षी शाहू महाराज,महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, अहिल्याबाई होळकर, महर्षी कर्वे, बसवेश्वर महाराज, पेरियार स्वामी यांनी स्त्रियांच्या उन्नतीसाठी केलेल्या कार्याचा अंश आपणास भारतीय राज्यघटनेत दिसून येतो. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मनुवादी आघोरी प्रथेविरोधातील चालीरीती विरोधात १९२७ साली महाड येथे मनुस्मृतीचे दहन करून स्त्री शिक्षणाबरोबरच स्वातंत्र्याचे हक्क स्त्रियांना देऊ केले. स्त्रियांमध्ये त्यांच्या अधिकाराविषयी जागरूकता येण्यासाठी १९४२ साली अखिल भारतीय अस्पृश्य महिला परिषद नागपूर येथे भरवली होती.परिषदेत स्त्रिया मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. स्रीयांना विशेषतः खाण कामगार स्त्रियांना प्रसूती भत्ता, कोळसा खाणीत काम करणाऱ्या स्त्री कामगारांना पुरुषा इतकीच मजुरी देणे, मजूर व कष्टकरी स्त्रियांसाठी २१ दिवसांची किरकोळ रजा, कामगार व नोकरी करणाऱ्या स्त्रियांना प्रसुती रजा मिळवून देणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे जगातील एकमेव होते.सामाजिक न्यायाची व स्त्री पुरुष समतेची लढाई खऱ्या अर्थाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लढली. . खरंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी समस्त भारतीय स्त्रियांच्या मानवी कल्याणाचा व स्त्री पुरुष समानतेचा विचार मांडला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १९२७ च्या महाडच्या चवदार तळे सत्याग्रहात तसेच १९३० च्या काळाराम मंदिर प्रवेशावेळी सुद्धा स्त्रियांचा सहभाग मोठ्या प्रमाणावर होता.पुरुषांच्या प्रगती बरोबरच स्त्रियांची प्रगती ही देश विकासासाठी आवश्यक आहे.कोणत्याही समाजाची प्रगती ही त्या समाजातील स्त्रियांच्या प्रगती वरती अवलंबून असते. असे परखड मत बाबासाहेबांनी व्यक्त केले होते. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय राज्यघटना बहाल करून भारतातील समस्त स्त्रियांना जगण्याचा हक्क बहाल केला. कलम ४५ प्रमाणे लहान मुला मुलींना प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत केले. स्त्रियांना शिक्षणाबरोबरच आंतरजातीय विवाह, विधवा विवाह,लग्न हे स्त्रियांवरती लादलेले नसावे. पती-पत्नीचे नाते व अधिकार समान पातळीवर असावे. बहुपत्नीत्वास पाय बंद करणे. स्त्रियांना वडिलांच्या संपत्तीतील हक्क दिला. गर्भपाताचा कायदा झाला. घटस्फोटाचा अधिकार मिळाला असे अनेक अधिकार स्त्रियांना मिळाले. ते केवळ डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळेच. १९४२ साली अखिल भारतीय अस्पृश्य महिला परिषद नागपूर येथे भरून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी महिलांना त्यांचे हक्क व अधिकारांविषयी जागरूक केले. अधिकार मिळवण्यासाठी संघर्ष करायला शिकवला. आज भारतीय समाजामध्ये महिला ज्या सन्मानाने जगतात. किंवा जे कायदे महिला सन्मानासाठी व हक्कांसाठी शासन सातत्याने पारित करीत आहे. त्याचे मुळ हिंदू कोड बिलात आहे. आज भारतीय स्वातंत्र्याच्या ७८ वर्षा नंतरही स्त्रियांपुढे अनेक प्रश्न उभे आहेत त्यामध्ये प्रामुख्याने शिक्षण आरोग्य सांस्कृतिक भेद आर्थिक विषमता महिलांवर होणारे अत्याचार लोकप्रतिनिधींच्या हक्काचे हनन, कामगार महिलांचे प्रश्न, प्रशासकीय अधिकारी कर्मचारी महिलांचे प्रश्न, अपंग महिलांचे प्रश्न, स्त्रीभ्रूणहत्या, एकल महिलांचे प्रश्न, लैंगिक शोषण मालमत्तेतील हक्कांमध्ये विषमता, निर्णय क्षमतेतील स्थान यासारख्या अनेक प्रश्नांना आजही महिलांना सामोरे जाताना त्यांची दमछाक होते. शासन या विषयांना सोडवण्यासाठी विविध प्रकारे न्याय देण्याचा प्रयत्न करीत आहे. राजमाता जिजाऊ, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, महात्मा ज्योतिबा फुले,राजश्री शाहू महाराज यांच्या विचारांवर कार्याला हिंदू कोड बिलाच्या रूपाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी कायदेशीर हक्क बहाल करण्याचे काम केले होते. त्या काळात हिंदू कोड बिल पारित झाले असते तर या प्रश्नांची धार बोथट झाली असती हे निश्चित.सन १९४८ रोजी संयुक्त राष्ट्रसंघाने मानवी हक्कांची सनद तयार केली होती. त्यात स्त्रियांचे काही वेगळे प्रश्न आहे. आणि त्यांचा मानवी हक्काच्या दृष्टीने ऊहापोह झाला पाहिजे असा विचार मांडला नव्हता.हिंदू कोड बिलाच्या रूपाने बाबासाहेबांनी महिलांना हक्कांचा जाहीरनामाच भारतीय संसदेसमोर मांडून जगासमोर आदर्श उभा केला होता. त्यानंतर महिलांच्या प्रश्नाला जागतिक स्तरावर १९७५ रोजी दखल घेण्या जोगा प्रयत्न केला. तो म्हणजे संयुक्त राष्ट्र संघाने प्रथम आंतरराष्ट्रीय महिला वर्षे जाहीर केले. व भारतामध्ये सुद्धा त्याच काळात समतेची वाटचाल या नावाने स्त्रियांच्या परिस्थिती विषयक अहवाल तयार करण्यात आला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर महिला विकासाच्या बाबतीत जगण्याच्या किती पुढे होते हे समस्त महिलांना जाणीव करून देणे गरजेचे वाटते .डॉ. बाबासाहेबांच्या साहित्याचे जास्तीत जास्त वाचन महिलांनी करावे. व स्वमुक्तीची प्रेरणा त्यातून घ्यावी. देशाची प्रगती ही फक्त पुरुषाची प्रगती नसून ती स्त्रियांची ही तेवढीच प्रगती आहे,असे स्पष्ट मत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे होते.डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्त्री विषयक कार्याकडे पाहताना आज ही स्त्री ही सर्वच क्षेत्रात पारंगत आहे. स्त्री मुक्तीचा खरा मार्ग डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनीच भारतीय राज्यघटनेतून दिला आहे.अशा महान महामानवास त्यांच्या १३४ व्या जयंती निमित्ताने विनम्र अभिवादन.
