
त्र्यंबकेश्वर (प्रतिनिधी )त्र्यंबकेश्वर तालुक्यातील काचुर्ली येथील मविप्र समाजाच्या आश्रमशाळेत मविप्र माजी विद्यार्थी संघटना व नेहरू विज्ञान केंद्र, मुंबई यांच्या सहकार्याने भ्रमणशील विज्ञान प्रयोगशाळा विद्यार्थ्यांच्या भेटीला आली होती. यावेळी या प्रयोगशाळेत विविध प्रकारचे २० प्रयोग-प्रात्यक्षिके -प्रतिकृती विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष बघायला तसेच अनुभवायला मिळाल्या. प्रत्यक्ष प्रतिकृती हाताळताना विद्यार्थ्यांना कुतूहल निर्माण होऊन कृतीचा आनंद होत होता.

यावेळी विविध प्रत्यक्षिकांतील वैज्ञानिक तत्वे विद्यार्थ्यांना स्पष्ट करण्यात आले. तसेच काही विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग घेत प्रयोगांचे स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केला. त्याचप्रमाणे ‘विविध जादूच्या प्रयोगांच्या माध्यमातून अंधश्रद्धा निर्मूलन व त्यातील वैज्ञानिक तत्व नेहरू विज्ञान केंद्राचे मार्गदर्शक शेखर मरकड, अनिकेत ठोके, पृथ्वीराज पाटील यांनी सविस्तर स्पष्ट केले. त्याशिवाय पृथ्वीची निर्मिती, पृथ्वीवर सजीवांची निर्मिती याविषयीची व्हिडीओ प्रोजेक्टरवर दाखविण्यात आले.या फिरत्या विज्ञान प्रयोगशाळेचा हा अनुभव विद्यार्थी व शिक्षकांसाठी आगळावेगळा अनुभव होता. यावेळी शाळेतील १ ली ते ८ वीच्या जवळपास ३३० विद्यार्थ्यांनी या प्रदर्शनाचा लाभ घेतला. यासाठी मविप्र माजी विद्यार्थी संघटनेचे प्रशांत निकाळे व सदस्यांनी नियोजन केले होते.यावेळी नवनाथ ठाकरे, तुषार पवार, अविनाश भिसे यांसह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
