
नाशिक:- ( प्रतिनिधी ) जीवन जगत असताना आलेल्या घटनांचा मागोवा आणि भेटलेल्या विविध व्यक्तींचे चित्रण करताना आलेल्या अनुभवांची साठवण म्हणजे ‘इरदडी’ आहे, असे उदगार ज्येष्ठ साहित्यिक राजेंद्र गांगुर्डे यांनी काढले. गिरणा गौरव प्रतिष्ठानच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त हुतात्मा स्मारकात आयोजित ‘इरदडी’ या पुस्तकावर ते बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी मुख्याध्यापक काशीनाथ उघडे होते. गांगुर्डे पुढे म्हणाले की, इरदडी नावाचा झरा ३५ वर्षापूर्वी संपूर्ण गावाची तहान भागवत होता. आज तो झरा नष्ट झाला आहे. त्या झऱ्याचे अस्तित्व पुसून टाकून “गरज सरो नि वैद्य मरो” अशी शोकांतिका मनाला बोचते. गावातील विविध माणसं, त्यांचे व्यक्तिमत्त्वातील वेगळपण यांचे चित्रण या पुस्तकात आहे, असे सांगून पुस्तकातील विविध पात्रांच्या स्वभाव वैशिष्ट्यांची माहिती त्यांनी दिली. रामदास धात्रक आणि नितीन बागुल यांचा ग्रंथभेट देऊन सन्मान करण्यात आला. सुरेश पवार यांनी सूत्रसंचालन केले तर राजेंद्र उगले यांनी आभार मानले. दरम्यान येत्या मंगळवारी (दि.१५) सुभाष उमरकर ‘अंतर्मनाचे अंतरंग’ या पुस्तकावर ऐसपैस गप्पा करणार आहेत.
