
मखमलाबाद ( वार्ताहर ) = मराठा विद्या प्रसारक समाजाचे श्री छत्रपती शिवाजी महाराज माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय मखमलाबाद येथे क्रांतीसुर्य,समाजसुधारक महात्मा ज्योतीबा फुले यांची जयंती व मखमलाबादचे मुलकी पाटील पंढरीनाथ झुंगाजी पिंगळे यांचा स्मृतिदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.प्राचार्य संजय डेर्ले,उपप्राचार्या विमल रायते, पर्यवेक्षक सुनील पाटील यांच्या शुभहस्ते प्रतिमा पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आले. याप्रसंगी व्यासपीठावर ज्येष्ठ शिक्षकवृंद उपस्थित होते.ज्येष्ठ शिक्षिका सुनिता उशीर यांनी क्रांतीसुर्य ज्योतिबा फुले यांच्या जीवन कार्याविषयी सखोल माहिती दिली.त्यांचा जन्म ११ एप्रिल १८२७ रोजी साताऱ्याला झाला.शिक्षणाची द्वारे ज्यांनी खुले केली असे सामाजिक समतेचा संदेश देणारे ज्योतिबा फुले यांनी १८४८ मध्ये पुण्यात मुलींसाठी पहिली शाळा काढली.मुलींच्या शिक्षणासाठी त्यांनी स्वतःची पत्नी सावित्रीबाई फुले यांना शिकविले. महात्मा फुले हे समतेचे पुरस्कर्ते होते.त्यांनी लिहिलेले “शेतकऱ्यांचे आसूड” हे पुस्तक प्रसिद्ध आहे. सामाजिक सुधारणेसाठी शुद्रांची स्थिती सुधारावी यासाठी ज्योतिबांनी १८७३ साली “सत्यशोधक समाजाची” स्थापना केली.त्यांनी आपल्या जीवनातील प्रत्येक क्षण शोषितांसाठी वेचला म्हणूनच त्यांना “महात्मा” म्हणून गौरविण्यात आले.ज्येष्ठ शिक्षिका सविता आहेर यांनी मखमलाबादचे मुलकी पाटील पंढरीनाथ झुंगाजी पिंगळे यांच्या जीवन कार्याविषयी आपले मनोगत व्यक्त केले.मखमलाबाद हे नाशिकच्या उत्तर पश्चिमेस असलेले एक सधन गाव.१८ पगड जातीचे हे गाव असून सुद्धा येथे सर्व लोक अतिशय गुण्यागोविंदाने नांदत आहेत.शेती हा येथील मुख्य व्यवसाय अशा या सधन गावचे मुलकी पाटील पंढरीनाथ झुंगाजी पिंगळे यांचा आज स्मृतिदिन. मखमलाबादच्या विकासामध्ये त्यांचा फार मोठा सहभाग होता. गावातील विविध मंदिरे,धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमात त्यांचा हिररीने सहभाग असायचा.मखमलाबादच्या ग्रामविकास मंडळाची सकसाराची साडेचार एकर जागेचे व मारुती मंदिर देवस्थानचे ते प्रमुख पंच होते.तसेच मविप्र समाजाचे श्री छत्रपती शिवाजी महाराज विद्यालयाच्या स्थापनेमागे त्यांची मोठी प्रेरणा होती.या सर्व कामांसाठी त्यांना गावातील प्रतिष्ठित ग्रामस्थांचे वेळोवेळी सहकार्य मिळाले,यामध्ये सहकारमहर्षी पोपटराव पिंगळे, गणपत बाबा पिंगळे,गंगाधर नाना महाले,मोतीराम पाटील पिंगळे, पंढरीनाथ दादा पिंगळे,कोंडाजी पाटील काकड,कारभारी पाटील काकड,दामू अण्णा तिडके, शंकरराव थोरात आदींचे मोलाचे सहकार्य त्यांना मिळाले.मखमलाबादचे प्रतिष्ठित शेतकरी पांडुरंग नाना पिंगळे, चंद्रभान पाटील पिंगळे व मविप्रचे माजी उपसभापती अॅड. पंडितराव पिंगळे यांचे ते वडील होते.तर मविप्रचे माजी सेवक संचालक डॉ.अशोकराव पिंगळे,मविप्रचे माजी संचालक सचिन पिंगळे,विद्यमान संचालक रमेश आबा पिंगळे यांचे ते आजोबा होते.अत्यंत शांतप्रिय व न्यायप्रिय व्यक्ती म्हणून या पंचक्रोशी मध्ये त्यांचा वावर होता असेही त्यांनी शेवटी सांगितले. ज्येष्ठ शिक्षिका सविता आहेर यांनी सूत्रसंचालन केले.जेष्ठ शिक्षक अनिल पगार यांनी आभार मानले. कार्यक्रमास सर्व शिक्षकवृंद शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
