
नाशिक:-(प्रतिनिधी ) अस्मानी-सुलतानी संकटांनी जमीन जशी नापीक झाली; तशीच समाजातली माणसंही माणुसकी विसरली आहेत. माणूसपण हरवलेली माणसं हेच खरं दुर्दैव आहे, असे मत पिंपळगाव जलाल (ता.येवला) येथील कवी प्रशांत वाघ यांनी केले.
गिरणा गौरव प्रतिष्ठानच्या वतीने हुतात्मा स्मारकात आयोजित गिरणा गौरव प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित ‘पुस्तकावर बोलू काही’ या उपक्रमात २६९वे पुष्प ‘वेदनांकुर’ या काव्यसंग्रहावर ऐसपैस गप्पा करताना ते बोलत होते. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ गझलकार सोमनाथ साखरे होते.
प्रशांत वाघ पुढे म्हणाले की, साहित्याच्या माध्यमातून माणसाला विचार पेरता आले पाहिजे. पावसाच्या सरी आल्यानंतर शेतकऱ्यांना होणाऱ्या आनंदाचा हिशोब होऊ शकत नाही. जमिनीची त्याने केलेली मशागत, त्यातून अंकुरणारे बीज जगण्याची प्रेरणा देत असते. सुखदु:खाच्या या परिवर्तनामध्ये शेवटी फक्त शून्य उरते. अनेक अपेक्षा ठेवून आणि अपार कष्ट करूनही त्याच्या हाती काही लगत नाही. अशा विविध जाणिवांच्या कविता या काव्यसंग्रहात मांडलेल्या आहेत, असेही ते म्हणाले.
शुभम अहिरे आणि चेतन मांडवडे यांना ग्रंथभेट देण्यात आली. तु.सी.ढिकले यांनी आभार मानले तर सुरेश पवार यांनी सूत्रसंचालन केले. दरम्यान येत्या मंगळवारी (दि.९) ज्येष्ठ साहित्यिक विक्रम गायकवाड ‘जगणे शोधत आहे’ या पुस्तकावर ऐसपैस गप्पा करणार आहेत.
