
हिमायतनगर (शेख मुजम्मील):
नांदेडचे जिल्हा पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांनी जिल्ह्यातील पोलीस प्रशासनात मोठे फेरबदल केले असून, हिमायतनगर पोलीस ठाण्याचे धडाकेबाज अधिकारी पीआय अमोल भगत यांची नयागाव येथे बदली झाली आहे. त्यांच्या जागी मुखेड येथून पोलीस निरीक्षक केंद्रे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
शहराला शिस्त लावणारे ‘सिंघम’ अधिकारी:
पोलीस निरीक्षक अमोल भगत यांनी आपल्या कार्यकाळात हिमायतनगर शहराला एक उत्तम शिस्त लावली. अत्यंत कर्तव्यदक्ष, न्यायप्रिय आणि सर्वसामान्यांना योग्य दिशा देणारे मार्गदर्शक म्हणून त्यांनी जनतेच्या मनात हक्काचे स्थान निर्माण केले. गुन्हेगारीवर वचक निर्माण करतानाच त्यांनी नेहमीच गरिबांना न्याय देण्याचे काम केले. पोलीस स्टेशनमध्ये येणाऱ्या प्रत्येक नागरिकाला सलोख्याची आणि सन्मानाची वागणूक देऊन त्यांनी पोलीस प्रशासनाची प्रतिमा उंचावली.
पोलीस स्टेशनचा केला ऐतिहासिक कायापालट:
अमोल भगत यांनी केवळ कायदा व सुव्यवस्थाच राखली नाही, तर आपल्या कल्पकतेतून हिमायतनगर पोलीस स्टेशनचा संपूर्ण चेहरामोहरा आणि नकाशाच बदलून टाकला. त्यांनी अथक परिश्रम घेऊन पोलीस ठाण्याच्या इमारतीचे आणि परिसराचे नूतनीकरण केले, ज्यामुळे आज हे पोलीस स्टेशन अत्यंत सुसज्ज, देखणे आणि ‘व्ही.आय.पी.’ (VIP) दर्जाचे बनले आहे. पोलीस ठाण्यात येणाऱ्या नागरिकांसाठी उत्कृष्ट सुविधा निर्माण करत त्यांनी या संपूर्ण परिसराला एक आदर्श आणि भव्य स्वरूप मिळवून दिले आहे. त्यांच्या या ऐतिहासिक विकासकामांची चर्चा आज संपूर्ण जिल्ह्यात मोठ्या अभिमानाने होत आहे.
नागरिकांमधून व्यक्त होतेय हळहळ:
आपल्या संवेदनशील, धडक कार्यपद्धतीने आणि अभूतपूर्व विकासकामांनी लोकप्रियतेचे शिखर गाठलेल्या भगत साहेबांच्या बदलीमुळे हिमायतनगर तालुक्यातून मोठी हळहळ व्यक्त होत आहे. एक कार्यक्षम, कर्तव्यदक्ष आणि जनतेचा खरा कैवारी अधिकारी हिमायतनगरमधून जात असल्याने नागरिकांकडून त्यांना पुढील वाटचालीस आणि नव्या प्रवासासाठी भावपूर्ण शुभेच्छा दिल्या जात आहेत.
