
✍🏻शब्दांकन – प्रा. अमोल श्रीकृष्ण अहिरे नाशिक
यशवंतराव शिवाय वेणूताई आणि वेणूताई शिवाय यशवंतराव हा विचारसुद्धा मनात करता येणार नाही. एवढे दोघांमधले घट्ट नाते होते. यशवंतराव वजा वेणूताई म्हणजे शून्य असे उभयतांचे वर्तन, स्वभाव, व परस्परांमधील नाते होते. वेणूताईंचे वागणे-बोलणे एका कर्मयोग्यासारखे होते. त्यांना कसलाही मोह नव्हता. लग्न करीन तर देशभक्ताबरोबर असे ध्येय उराशी बाळगलेल्या वेणूताईंचा विवाह यशवंतरावांशी २ जून १९४२ रोजी झाला. देशभक्तीचा संसार म्हणजे सुळावरील पोळी असाच होता. ऑगस्ट १९४२ मध्ये भारत छोडो आंदोलनात यशवंतरावांनी सक्रिय सहभाग घेतला आणि वेणूताईंच्या वैवाहिक जीवनात यशवंतरावांच्या तुरुंगवासातील हाल-अपेष्टा सहन करण्याची वेळ आली. त्यातच वेणूताईंच्या दोन लहान दिरांचे अकाली निधन झाले. यामुळे वेणूताईंना जावा, त्यांच्या मुलाबाळांचे संगोपन आणि पालन पोषण करण्याची जबाबदारी आली. शिवाय सासुबाईंचे सेवा त्या आधीपासूनच करीत होत्या.
यशवंतराव हे दिल्लीतील महाराष्ट्राचे वैभव स्थान होते. तर वेणूताई महाराष्ट्रीयन संस्कृतीचे प्रतीक. त्यांच्या डोक्यावरचा पदर कधी घसरलं नाही. एका मंत्र्याची पत्नी कशी असावी. तिचा पेहराव व वागणूक कशी असावी. याच्या ताई आदर्श मूर्तिमंत उदाहरण होत्या. वेणूताईंचे आदरातिथ्य पाहुण्यांना, नातेवाईकांना, राजकारणी मंडळींना आश्चर्यचकित करत असे. त्या आपल्या घर गड्यांशी व नोकर-चाकरांशी अतिशय प्रेमाने व आपुलकीने वागत असत. त्यांचा बहुतांश वेळ यांच्या मध्येच जात असे.
१९४९ सालची गोष्ट. यशवंतराव तेव्हा पार्लमेंटरी सेक्रेटरी होते. ते मुंबईत एकटेच रहात होते. वेणूताईंना क्षयाची बाधा झाली होती. म्हणून त्यांना मिरजेच्या दवाखान्यात दाखल केले होते. यशवंतरावांच्या जीवनातील मोठा खडतर काळ होता. ते शरीराने मुंबईत असले तरी त्यांचे सगळे लक्ष कराडमध्ये व मिरजेमध्ये लागले होते. प्रदीर्घ उपचारानंतर डॉक्टरांनी वेणूताईंना विश्रांतीसाठी घरी घेऊन जायला सांगितले. त्यांना घेऊन येण्यासाठी यशवंतराव मुंबईहून मिरजेला गेले. शहराबाहेरील माळावर एका मोकळ्या व हवेशीर जागेत क्षयरोग झालेल्या रुग्णांची राहण्याची व्यवस्था केली होती. तिथेच एका छोट्याशा खोलीत लोखंडी खाटेवर (पलंगावर) वेणूताई झोपून होत्या. यशवंतराव पलंगावर बसले. ती वैशाखातील एक उदास दुपार होती. वारा स्तब्ध होता. यशवंतरावांनी वेणूताईंच्या प्रकृतीची चौकशी केली. वेणूताईंनी तब्येतीची एकूण अवस्था सांगितली. यशवंतराव चेहऱ्यावर हसू आणत म्हणाले, ‘तू लवकर बरी होशील.’ काही क्षण असेच निघून गेले. मग वेणूताई म्हणाल्या, ‘डॉक्टर म्हणतात, यापुढे संतती होण्याचा संभव नाही.’ यशवंतराव स्तब्ध बसून होते. मग थोडे थांबून त्या म्हणाल्या, ‘तुम्हाला वंशाचा दिवा पाहिजे. तुम्ही दुसरं लग्न करा.’ यशवंतरावांची स्तब्धता जरासुद्धा ढळली नाही. पण त्यांच्या डोळ्यातून अश्रू पाझरत होते. वेणूताईंनी काहीशा आग्रही स्वरात पुन्हा तेच सांगितलं, तेव्हा स्थिर व दृढनिश्चयी स्वरात ते म्हणाले, ‘मला वंशाच्या दिव्याची आवश्यकता नाही. येथून पुढे तुला मी आणि मला तू. हा विषय इथे बंद !
ओसाड माळावर भर दुपारी वेणूताईंना दिलेला शब्द यशवंतरावांनी आयुष्यभर पाळला. शेवटपर्यंत ते दोघे एकमेकांसाठी जगले!
मे १९८३ च्या शेवटच्या आठवड्यात वेणूताईंनी अंथरूण धरले. २ जून वेणूताईंच्या लग्नाचा वाढदिवस. यानिमित्ताने वेणूताईंचे भाऊ, भावजया, पुतणे दिल्लीत आले होते. १ जूनला सकाळी त्यांनी घरातील सर्व नोकरचाकर यांना बोलावून घेतले आणि उद्यासाठी काय काय आणायचे आहे, याची यादी केली आणि पैसे दिले. साधारण साडे दहाच्या सुमारास आपल्याला आज दवाखान्यात हलवणार असल्याचे ताईंना जाणवले. यशवंतरावांना त्यांनी जवळ बोलावून घेतले. तुम्ही मला दवाखाण्यात ठेवणार आहात का? असा प्रश्न विचारला. घरी उपचार करणे आता शक्य नाही असे यशवंतराव म्हणताच मला हो की नाही एवढेच सांगा असे ताई म्हणाल्या. यशवंतरावांनी ‘हो’ म्हणताच काही सेकंदात सकाळपासून हसत-खेळत, अतिशय आनंदात, उत्साहात असलेल्या वेणूताई यशवंतराव यांच्या अंगावर कोसळल्या आणि त्यांच्या कुशीतच त्यांची प्राणज्योत मावळली. १ जूनला सायंकाळी त्यांचा मृतदेह मुंबईत आणण्यात आला. २ जून १९४१ रोजी सुहासिनीचा साजशृंगार करून वेणूताईंनी यशवंतरावांच्या घरात प्रवेश केला होता. तब्बल ४१ वर्षानंतर २ जून १९८३ रोजी चव्हाणांचा उंबरठा ओलांडून वेणूताई दूरच्या प्रवासाला निघून गेल्यात. फरक एवढाच होता की या वेळी प्रथम यशवंतरावांच्या मागे जाण्याची प्रथा मोडून वेणूताई पुढे आणि यशवंतराव मागे होते.
१ जून वेणुताईंचा स्मृतीदिन यशवंतराव चव्हाण साहेबांना आयुष्यभर साथ देणाऱ्या या माऊलीच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन…
