
नाशिक (प्रतिनिधी)वैशाली प्रकाशन, पुणे प्रकाशित कवी एकनाथ चंद्रभागा म्हाळू वाघ यांच्या ‘फिर्याद’ या काव्यसंग्रहाचा प्रकाशन सोहळा उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी योगाचार्य अशोक पाटील होते. ज्येष्ठ साहित्यिक तु. सी. ढिकले यांच्या हस्ते काव्यसंग्रहाचे प्रकाशन करण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात प्रतिमापूजन व दीपप्रज्वलनाने झाली. यानंतर मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. नगरसेवक पहिलवान वाळूजी काकड, ज्येष्ठ कवी प्रदीप गुजराथी, ज्येष्ठ कवयित्री जयश्री साठे, प्रकाशक विलास पोतदार आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.

प्रास्ताविकानंतर पाहुण्यांच्या हस्ते ‘फिर्याद’ या काव्यसंग्रहाचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी कवी एकनाथ वाघ व सौ. मीराबाई वाघ यांचा तसेच मुखपृष्ठकार रचना आहिरे यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
मनोगत व्यक्त करताना ज्येष्ठ साहित्यिक तु. सी. ढिकले म्हणाले, “‘फिर्याद’मध्ये माणूसपण जपणारी कविता आहे. जे-जे सोसलं ते-ते या कवितेत आलेलं असल्याने ही कविता मनाला भिडते. ही कविता पुस्तकी ज्ञानावर आधारित नसून संघर्षातून निर्माण झालेली आहे. या कवितांमध्ये विद्रोहाबरोबर आशावाद आणि सकारात्मक जाणिवांची मांडणी आढळते. विचारांचे भरणपोषण करणारी ही कविता आहे.”
ज्येष्ठ कवी प्रदीप गुजराथी यांनी “कविता ही मनात रुजली पाहिजे. पुस्तक हेच ज्ञानाचे मस्तक असते. कवीने सतत प्रयोगशील राहिले पाहिजे,” असे प्रतिपादन केले.
ज्येष्ठ कवयित्री जयश्री साठे म्हणाल्या, “‘फिर्याद’मधील कविता केवळ तक्रार करत नाहीत, तर उपायही सुचवतात. समाजातील अनेक प्रश्न या कवितांमधून मांडले गेले आहेत. आतून जे येते तेच खरे असते आणि प्रामाणिकपणा हे या काव्यसंग्रहाचे वैशिष्ट्य आहे.”
कवी एकनाथ वाघ यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, “लहानपणापासून संघर्षाची वाटचाल अनुभवलेली असल्याने माझ्या कवितेचा प्रवास वेगळा राहिला आहे.” यावेळी त्यांनी संग्रहातील काही कविता सादर करून उपस्थितांची दाद मिळवली.
अध्यक्षीय भाषणात योगाचार्य अशोक पाटील म्हणाले, “संवेदनशील कवी हा जगण्याचे तत्त्वज्ञान मांडत असतो. जीवनातील घटनांकडे जाणीवपूर्वक पाहिल्याने शब्दांना पंख फुटतात आणि कविता निर्माण होते. ‘फिर्याद’ हा समृद्ध अनुभवांनी परिपूर्ण असा सकस काव्यसंग्रह आहे.”
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रवींद्र मालुंजकर यांनी केले, तर आभार प्रदर्शन महेश एकनाथ वाघ यांनी मानले. कार्यक्रमानंतर उपस्थितांसाठी अल्पोपहाराचे आयोजन करण्यात आले.
