
प्रजाहितदक्ष राज्यकर्त्या
पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर

भारताच्या इतिहासातील एक अद्वितीय, पराक्रमी आणि प्रजाहितदक्ष राज्यकर्त्या पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या ३०१ व्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन ॥
पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर प्रजाहितदक्ष आणि न्यायप्रिय राज्यकर्त्या होत्या. त्यांनी मल्हारराव होळकरांच्या निधनानंतर इंदूरच्या सुभेदार म्हणून अत्यंत कुशलतेने राज्याची धुरा सांभाळली.आपल्या प्रजेला पोटच्या मुलाप्रमाणे मानले आणि 'प्रजाहित' हेच आपल्या जीवनाचे अंतिम ध्येय मानले. अहिल्यादेवींचा न्यायनिवाडा अत्यंत कडक,नि:पक्षपाती आणि पारदर्शक होता; गुन्हेगार स्वतःचा नातेवाईक असला तरी त्यांनी कधीही दया दाखविली नाही.आपल्या राज्यात चोऱ्या आणि दरोड्यांचे प्रमाण शून्यावर आणून प्रजेला सुरक्षित आणि भयमुक्त जीवन दिले.
पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी शेती आणि शेतकऱ्यांना राजाश्रय दिला, पडीक जमिनी लागवडीखाली आणल्या आणि करप्रणाली अत्यंत न्याय्य व सुलभ केली.त्यांनी सांस्कृतिक आणि धार्मिक पुनरुत्थान संपूर्ण भारतात विखुरलेल्या प्रमुख हिंदू तीर्थक्षेत्रांचा जीर्णोद्धार केला, ज्यामुळे त्यांना ‘हिंदुस्थानच्या राष्ट्रमाता’ म्हटले जाते.वाराणसीचे प्रसिद्ध काशी विश्वनाथ मंदिर आणि सोमनाथचे मंदिर यांचा पुनर्बांधणीचा बहुमान अहिल्यादेवींकडेच जातो.
त्यांनी हिमालय,बद्रीनाथपासून ते दक्षिणेत रामेश्वरमपर्यंत शेकडो मंदिरांचे घाट, पाऊलवाटा आणि धर्मशाळा बांधल्या.संपूर्ण देशातील प्रवाशांची आणि तीर्थयात्रिकांची सोय व्हावी म्हणून त्यांनी प्रमुख मार्गांवर शेकडो विहिरी,बारवा म्हणजे तळापर्यंत जाण्यासाठी सुंदर दगडी विटांच्या पायऱ्या असलेल्या विहिरी तथा पाणपोयांची निर्मिती केली होती. त्यांनी दररोज गोरगरिबांना अन्नदान आणि वस्त्रदान करण्याची अविरत परंपरा सुरू ठेवली.त्या कुशल प्रशासक आणि अर्थतज्ज्ञ होत्या.इंदूरला एका लहान गावाकडून एका समृद्ध आणि वैभवशाली व्यापारी केंद्रामध्ये रूपांतरित करण्याचे श्रेय अहिल्यादेवींना जाते.त्यांनी महेश्वर या आपल्या राजधानीत वस्त्रोद्योगाला चालना दिली, ज्यातून जगप्रसिद्ध ‘महेश्वरी साड्यां’चा उदय झाला.कला, साहित्य आणि विद्वानांना त्यांनी नेहमीच राजाश्रय दिला; त्यांच्या दरबारात अनेक नामवंत कवी आणि विचारवंत होते.राज्याचा खजिना हा प्रजेच्या कल्याणासाठीच आहे,अशी त्यांची ठाम धारणा होती आणि त्यांनी शासकीय निधीचा वापर अत्यंत काटकसरीने केला. जलव्यवस्थापनावर त्यांनी विशेष भर देऊन शेतीसाठी विहिरी आणि तलावांचे मोठे
जाळे निर्माण केले.
अठराव्या शतकात जेव्हा स्त्रियांच्या शिक्षणावर आणि हक्कांवर अनेक सामाजिक बंधने होती अशा काळात त्यांनी शिक्षणाचे महत्त्व ओळखून दुरगामी पावले उचलून फार मोठे शैक्षणिक कार्य केले.त्यांनी मुलींना आणि महिलांना प्राथमिक शिक्षण लिहिता वाचता येणे व हिशोब ठेवणे यासाठी अनौपचारिकपणे प्रोत्साहन दिले.महिलांना लष्करी शिक्षण देऊन स्वसंरक्षणाचे धडे दिले तसेच प्रशासनिक शिक्षण दिले. समाजाला सुसंस्कृत,स्वावलंबी व विद्यावान बनविणे असा व्यापक उद्देश त्यांच्या शैक्षणिक कार्याचा होता.अहिल्याबाई एक शूर योद्धा आणि कुशल प्रशासक होत्या.त्यांनी स्वतः घोड्यावर स्वार होऊन अनेक युद्धांचे नेतृत्व केले. त्यात त्या यशस्वीही झाल्या.त्यांनी आपल्या सैन्याला आधुनिक शस्त्रास्त्रांनी सज्ज केले आणि राज्याच्या सीमा सुरक्षित ठेवल्या.भील आणि इतर डोंगरी जमातींना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांनी त्यांना जमिनी दिल्या आणि संरक्षणाची जबाबदारी देऊन रोजगार दिला.आपल्या अफाट कर्तृत्वाने त्यांनी तत्कालीन पुरुषप्रधान व्यवस्थेत स्त्री शक्तीचे एक आदर्श आणि प्रेरणादायी उदाहरण प्रस्थापित केले.त्यांचे संपूर्ण आयुष्य हे त्याग, कर्तव्यनिष्ठा, अध्यात्म आणि लोककल्याणाचा एक त्रिवेणी संगम होते,म्हणूनच प्रजा त्यांना आदराने ‘पुण्यश्लोक’ म्हणून ओळखत असे. कुशल प्रशासक, निःपक्षपाती व पारदर्शक न्याय निवाडा करणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांना ३०१ व्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन ॥
समता गौरव पुरस्कार प्राप्त
प्रा.अरुण बाबारावजी बुंदेले,
अमरावती .८०८७७४८६०९
