
नाशिक- (बातमीदार..) नाशिक मधून प्रकाशित होणाऱ्या ‘सुभाषित’ या विनोदी दिवाळी अंकाला अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघाच्यावतीने दिला जाणारा उत्कृष्ट विनोदी दिवाळी अंकासाठीचा द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार आज पुणे येथे झालेल्या कार्यक्रमात ज्येष्ठ साहित्यिक इतिहासतज्ञ राजा दिक्षित यांच्या हस्ते सुभाष सबनीस यांनी स्वीकारला. याच कार्यक्रमात सुभाष सबनीस यांना प्रकाशक लेखक हा पुरस्कारही ‘म्युचुअल फंड’ या पुस्तकासाठी प्रदान केला गेला. सुभाषित विनोदी दिवाळी अंकाला यावर्षी फलटण येथील ॲग्रोन्यूज परिवार चॅरिटेबल ट्रस्टच्यावतीने दिला जाणारा छत्रपती संभाजी महाराज साहित्य पुरस्कार, अक्षरबंध प्रतिष्ठान, नाशिक, उल्हासप्रभात,ठाणे या पुरस्कारानंतर मिळालेला हा सलग चौथा पुरस्कार आहे. गेली पंधरा वर्ष सुभाषित विनोदी दिवाळी अंक नाशिक येथून प्रकाशित होत असून नवोदित तसेच जुन्या जाणत्या विनोदी लेखक, चित्रकार, व्यंगचित्रकार यांना व्यासपीठ मिळवून देण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत आहे. पंधरा वर्षांमध्ये एकतीस पुरस्कार मिळालेला नाशिक मधील हा महत्त्वाचा दिवाळी अंक आहे. यावेळी व्यासपीठावर प्रकाशक संघाचे अध्यक्ष राजीव बर्वे, प्रमुख पाहुणे गझलकार प्रदीप निफाडकर, नागपूरचे ग्रंथ वितरक अनिल टाकसाळे, कार्यवाह पराग लोणकर, प्रकाशक संघ नाशिकचे अध्यक्ष विलास पोतदार,आवाजचे भारत पाटकर, उद्वेलीचे विवेक मेहेत्रे, वेदांतश्रीचे सुनील उंब्रजकर हे उपस्थित होते.
सुभाषितच्या या यशाबद्दल संपादक सुभाष सबनीस यांचे नाशिक कवीचे अध्यक्ष बाळासाहेब मगर, भोसला स्कूलचे कार्याध्यक्ष ॲड. अविनाश भिडे, प्रकाशक संघाचे अध्यक्ष विलास पोतदार, मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील, साहित्यिक विवेक उगलमुगले,रवींद्र मालुंजकर, कवी संदीप देशपांडे यांनी अभिनंदन केले आहे.
