
मॉर्निंग ग्रुप ज्येष्ठ नागरिक मंडळाच्या मासिक सभेत रसिक मंत्रमुग्ध
नाशिक. (प्रतिनिधी)-जीवनातील अनुभव, सामाजिक जाण आणि भावविश्व यांचे सुंदर दर्शन कवितेतून घडत असते. त्यामुळे कविता आणि साहित्य अतिशय महत्त्वाचे आहे. कवितेतून भरभरून जीवनानंद मिळत असल्याचे प्रतिपादन प्रसिद्ध कवी रवींद्र मालुंजकर यांनी केले.
मॉर्निंग ग्रुप ज्येष्ठ नागरिक मंडळाच्या मासिक सभा आणि सभासद वाढदिवस सोहळ्यात प्रमुख अतिथी म्हणून रवींद्र मालुंजकर बोलत होते. मंचावर ज्येष्ठ उद्योजक हरदयालसिंग शीतल, मंडळाचे अध्यक्ष हिरामण पवार, मधुकर पाटील, राजाराम कोल्हे, नारायण बडगुजर उपस्थित होते.
कवी मालुंजकर म्हणाले की, कविता हा ज्ञानाचा संपन्न खजिना आहे. तसेच साहित्याने माणसाला सर्वार्थाने उभं करण्याचं काम केलं आहे. शालेय वयातील कविता आजही जगण्याला उभारी देतात, असे सांगून विविध कविता सादर करून उपस्थितांची मने जिंकली. हरदयालसिंग शीतल यांनी संस्थेच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. दिलीप राजोळे, अरुण पाटील, भागवत नारखेडे, वेडू पाटील, सतीश मैंद यांच्यासह सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. पाहुण्यांचा परिचय प्रा.डॉ.गिरीश पाटील यांनी करून दिला. संस्थेचे सभासद गुलाबराव चौधरी यांच्या सहकार्याने सभासदांना ओळखपत्र वाटप करण्यात आले.
मंडळातर्फे मे महिन्यात वाढदिवस असलेल्या १५ सदस्यांचाही मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तुकाराम येवले यांनी सत्कारार्थींचा परिचय करून दिला. प्रारंभी मंडळाचे सल्लागार जितेंद्र येवले यांनी प्रास्ताविक सादर करून मंडळाच्या कार्याचा आढावा मांडून मंडळाच्या वाटचालीबद्दल समाधान व्यक्त केले. नारायण बडगुजर यांनी सूत्रसंचालन केले. रमेश जगताप यांनी आभार मानले
