
सोलापूर( प्रतिनिधी)÷दिनांक 19 महाराष्ट्रातील ज्येष्ठ साहित्यिक प्रा. डॉ.अर्जुन व्हटकर यांच्या “चलबट”या आत्मचरित्रास दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभा, कोल्हापूर यांच्यातर्फे पुरस्कार जाहीर करण्यात आलेला आहे. सदर पुरस्काराचे वितरण हे दिनांक 24 मे 2026 रोजी कोल्हापूर येथे सकाळी 10.30 वाजता शेठ रामभाई सामाणी स्मृती हॉल, शिवाजी उद्यमनगर,कोल्हापुर येथे होणार आहे. ज्येष्ठ साहित्यिक रवींद्र ठाकूर,धनंजय बिजले, रमेश साळुंखे,नीलाबंरी कुलकर्णी शशिकांत चौधरी इत्यादी अनेक साहित्यिकांना पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.

अर्जुन व्हटकर यांच्या “तुंबण”या कथासंग्रास यापूर्वी महाराष्ट्र शासनाचा कै.ग.ल.ठोकळ हा पुरस्कार प्राप्त झालेला आहे.मुक्या जंगलाची गर्जना या कथासंग्रहाला महाराष्ट्र शासनाचा कै. पंजाबराव देशमुख पर्यावरण पुरस्कार तसेच मध्य प्रदेश शासनाचा भोपाळ साहित्य अकादमीचा कवी कै. भा.रा.तांबे या पुरस्काराने सन्मानीत करण्यात आलेले आहे. तसेच गंगुबाई गुरव साहित्य पुरस्कार मराठी साहित्य संघ बेळगाव, आंबेडकराईट मुव्हमेंट ऑफ कल्चरल अँड लिटरेचर नागपूर या संस्थेतर्फे दिला जाणारा “दया पवार” राज्यस्तरीय पुरस्कार देखील नुकताच त्यांना प्राप्त झालेला आहे. भि.ग.रोहमारे कोपरगाव पुरस्कार माहेश्वरी अर्बन बँक माढा पुरस्कार, कै. देशभक्त बळवंतराव मगर पुरस्कार, कै.गोविंदराव अदिक पुरस्कार, कै. शंकरराव पाटील पुरस्कार,सेतुबंध पुरस्कार,डिसले पुरस्कार, वरणगावकर पुरस्कार जळगाव, अशा महाराष्ट्रातील नामवंत संस्थेचे पुरस्कार अर्जुन व्हटकर यांच्या साहित्यकृतीला मिळालेले आहेत.
