
नाशिक:-सटाणा तालुक्यातील देवळाणे हे माझे मूळगाव. नाशिकला महाविद्यालयात शिकत असताना कवितेचं बीज रोवलं गेलं. त्यावेळी हंप्राठा महाविद्यालयात कुसुमाग्रज यांचा ‘विशाखा’ हा काव्यसंग्रह ज्येष्ठ नाटककार प्रा. वसंत कानेटकर शिकवायचे, त्यामुळे कवितेकडे पाहण्याचा दृष्टिकोन मिळाला. प्रारंभी दैनिक गावकरीत कविता प्रकाशित झाल्या. विविध काव्यस्पर्धांमध्ये बक्षीस मिळायला लागल्यावर मुक्तछंद शैली जोपासली. हंप्राठा महाविद्यालयात असताना तेथील वार्षिकाचा विद्यार्थी संपादक होतो, असे प्रतिपादन ज्येष्ठ कवी, लेखक प्राचार्य प्र.द.कुलकर्णी यांनी महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा नाशिकरोड आयोजित संवाद सृजनाशी मालिकेच्या दुसऱ्या पर्वातील छत्तीसावे पुष्प गुंफताना केले. कार्यक्रमाच्या अध्यक्ष सोनाली पाटील यांनी मायेची शाल, ग्रंथभेट आणि स्मृतिचिन्ह देऊन त्यांचे स्वागत केले.
प्राचार्य प्र.द.कुलकर्णी यांनी आगळेवेगळे आणि वैशिष्ट्यपूर्ण उपक्रम राबविणारी मसापची नाशिकरोड शाखा ही राज्यात एकमेव शाखा आहे, असे शाखेबद्दल गौरवोदगार काढत ते पुढे म्हणाले की, ज्या पुणे विद्यार्थी गृह संस्थेच्या वसतिगृहात राहिलो-शिकलो, त्याच संस्थेत गरजू विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक कार्य करता यावे, म्हणून रुजू झालो. १९८५ मध्ये ‘इंदिरा तू युगंधरा’ हा पहिला काव्यसंग्रह प्रकाशित झाला. त्याला रशियन सरकारचे सुवर्णपदक मिळाले. नंतरच्या काळात निर्गुण आध्यात्मिक विचारांकडे वळलो, असेही ते म्हणाले.
‘किती उपसू काळोख / जन्म काळोखाची नाळ
माझ्या पायात बांधील/सूर्य घुंगराचे चाळ…’
या आशयघन कवितेसह-
कुणीही फोटो काढत नसतो…
तो चेहराच तसा हसरा असतो !’
आणि
‘आयुष्य आपले ज्या ठिकाणी थांबते
त्या ठिकाणी फक्त एक चौकट असते !’
अशा काही सकस छोटेखानी कविता सादर करत रसिकांना मंत्रमुग्ध केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशांत कापसे यांनी केले. मंगला सातभाई यांनी सादर केलेल्या स्वागतकाव्याने कार्यक्रमाची सुरुवात झाली. लेखक विष्णुपंत गायखे यांनी प्रास्ताविक केले तर श्रीकांत पाटील यांनी अतिथींचा परिचय करून दिला. मनोहर भोर यांनी आभार मानले. सुमन हिरे यांनी सादर केलेल्या पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रमास प्राचार्य सुभाष भावसार, प्राचार्य आर.व्ही.जोशी, उल्हास गायधनी, पद्माकर देशपांडे, हेमंत महाजन, प्राचार्य के.मा.मोरे, गणपतराव मुठाळ, सुशील जोशी, रामदास नागवंशी, उद्देश शेवाळे, सुरेंद्र कपोते, ॲड.संगीता पाटील, डॉ.सुधीर ठोसर आदींसह साहित्यरसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
