
नाशिक:-(प्रतिनिधी ) कोल्हापूरच्या दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेच्या वतीने डॉ.पावसकर यांच्या मातोश्री कमल मनोहर कोपर्डे यांच्या स्मरणार्थ कवयित्रीसाठी देण्यात येणारा जनाबाई पुरस्कार प्रतिभा सुरेश खैरनार यांच्या ‘वंशावळीच्या प्राचीन सरीतून’ या काव्यसंग्रहाला जाहीर करण्यात आला आहे.
ज्येष्ठ कवयित्री प्रा.डॉ.प्रज्ञा दया पवार आणि समीक्षक विजय चोरमारे या परीक्षकांनी परीक्षण केले असून २५ हजार रुपये आणि सन्मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे. येत्या २४ मे रोजी ज्येष्ठ साहित्यिक डॉ.सुनीलकुमार लवटे यांच्या हस्ते कोल्हापूर येथे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. यापूर्वी या संग्रहाला नारायण सुर्वे साहित्य कला अकादमीकडून नारायण सुर्वे पुरस्कार, नाशिकच्या सार्वजनिक वाचनालयाचा जयश्री पाठक पुरस्कार, पद्मश्री नामदेव ढसाळ ‘काव्यप्रतिभा’ पुरस्कार, मसाप शाखा राजगुरूनगरचा यशवंतराव चव्हाण साहित्य पुरस्कार, शिवांजली साहित्य पुरस्कार यांसह मानाचे विविध पुरस्कार मिळाले आहेत. या सन्मानाबद्दल प्रतिभा खैरनार यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
