
कोल्हापूर :(प्रतिनिधी ) दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेच्या वतीने देण्यात येणारे राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार नुकतेच जाहीर करण्यात आले आहेत. यामध्ये सावित्रीबाई पुरस्कारासाठी सामाजिक कार्यकर्त्या उल्का महाजन, कोयनामाई पुरस्कारासाठी अभिनेत्री चिन्मयी सुमित, जनाबाई पुरस्कारासाठी प्रतिभा शेलार तसेच वि. स. खांडेकर पुरस्कारासाठी नितीन कोतापल्ले यांची निवड करण्यात आली आहे.
पुरस्काराचे स्वरूप प्रत्येकी २५ हजार रुपये, सन्मानचिन्ह व मानपत्र असे असून रविवार दि. २४ मे रोजी कोल्हापूर येथे ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सुनीलकुमार लवटे यांच्या हस्ते पुरस्कार वितरण सोहळा पार पडणार आहे.
पाटण (सातारा) येथील कवयित्री प्रा. डॉ. रामकली पावरसकर यांनी दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेकडे ठेवलेल्या निधीतून हे पुरस्कार दिले जातात. त्यांच्या वडिलांच्या स्मरणार्थ वि. स. खांडेकर यांच्या नावाने हा पुरस्कार देण्यात येतो. साहित्य, सामाजिक कार्य आणि सांस्कृतिक क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाची दखल घेऊन या मान्यवरांची निवड करण्यात आल्याचे आयोजकांनी सांगितले.
