

लेखक:- अँड अर्चना धवलचंद्र आढाव
महात्मा फुले….सार्वजनिक क्रांतीचा यलगार””नाव त्याचे ज्योती काम केलं नावाप्रमाणेच ,आपल्या अंधाऱ्या घरात, प्रकाश लावला त्यानेच, ना कुणाची पर्वा केली, ना कुणाची भीती, काम आपला करीत राहिला, शिकली माझी आई, शिकली माझी बहीण, शिकेल माझी मुलगी तेही यांच्यामुळेच…” वरील वाचनात आलेल्या कवितेच्या ओळी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या बाबतीत अगदीच सार्थ ठरतात. महात्मा फुलेंनी किती महत्त्वाचे कार्य केले याचा सारांश यातून दिसतो. भारताचा इतिहास जर बघितला तर अनेक थोर व्यक्तिमत्त्वांनी समाजातील अंधश्रद्धा, अज्ञान, विषमता याविरुद्ध लढा दिला. पण या सर्वांमध्ये सर्वप्रथम ज्यांनी शिक्षण, स्री स्वातंत्र्य, जातीयवादाविरुदध् लढा आणि शेतकऱ्यांच्या हक्कासाठी महान कार्य केले,

ते म्हणजे आपणा सर्वांचे महात्मा ज्योतिबा फुले. ते एक विचारवंत, लेखक आणि कृतिशील नेता व दूरदर्शी विचारांचे समाज सुधारक होते. सामाजिक कार्याचे अग्रदूत आणि शिल्पकार म्हणूनही त्यांच्या कार्याचा उल्लेख केला जातो. त्यांनी दिलेला लढा केवळ व्यक्तिगत नव्हता तर तो सार्वजनिक आणि सर्वव्यापी होता. समाजाच्या मूलभूत रचनेत बदल घडविण्याचे महत्त्वाचे कार्य महात्मा फुलेंनी केले. महात्मा फुलेंनी जी महान क्रांती केली ती मानवाच्या स्वातंत्र्य समता बंधुता आणि न्याय यावर आधारित राष्ट्र निर्माण , जी क्रांती सामाजिक शैक्षणिक धार्मिक साहित्यिकसह मानवी जीवनाच्या सर्वांगीण विकासासाठी होती. ज्योतिराव फुले यांचा जन्म 11 एप्रिल 1827 ला पुणे येथे झाला. वडील शेती आणि फुलाचा व्यवसाय करीत असे. वयाच्या सातव्या वर्षी ज्योतिरावांना शाळेत घातले होते. अतिशय तल्लख बुद्धिमत्तेमुळे वर्गात ते पुढे होते. त्याचवेळी त्यांच्या घरी शेती, फुल आणि इतर व्यवसायांचे हिशेब लिहिण्यासाठी एक पूर्ण वेळ ब्राह्मण कारकून होता. त्याला ज्योतिरावांची शिक्षणातली प्रगती सहन झाली नाही. आणि ज्योतिराव शिकून मोठा झाल्यावर आपली नोकरी जाईल ,ही भीती वाटली त्यामुळे त्यांनी गोविंदराव म्हणजेच ज्योतिबाच्या वडिलांना मुले शिक्षणामुळे बिघडतात . ज्योतिबा शिकल्यास शेती बुडेल असे सांगून ज्योतिबाच्या शिक्षण बंद केले. आता ज्योतिबा शेती ,बागकाम करू लागले. वयाच्या चौदाव्या वर्षी ज्योतिबा आणि सावित्रीबाई यांचा विवाह झाला. गफारबेग मुंशी व लिजिट साहेब यांच्या आग्रहामुळे गोविंद रावांनी ज्योति रावांना पुन्हा शाळेत घातले. ज्योतीबा दरवर्षी वर्गात प्रथम क्रमांक मिळवीत गेले. सातवीची इंग्रजी परीक्षा वयाच्या विसाव्या वर्षी पास झाले. त्यांनी अनेक पुस्तके वाचली. त्यांना मराठी संस्कृत हिंदी, इंग्रजी उर्दू मुळीभाषा लिहिता वाचता बोलता येत होत्या. याच दरम्यान सदाशिव गोवंडे या मित्रांनी त्यांना शिवाजी महाराजांची चरित्र वाचायला दिले . तसेच थॉमस पेन यांची “राईटस ऑफ मॅन “हा ग्रंथ वाचला. या ग्रंथातूनच शिक्षणामुळे मनुष्य समृद्ध जीवन जगू शकतो, हा अनुमान त्यांनी काढला. दरम्यान 1847 ला अमेरिकन निग्रो लोकांनी पुकारलेले स्वातंत्र्य युद्ध या घटनेचाही विधायक परिणाम झाला. सखाराम परांजपे या मित्राच्या लग्नाचे मिरवणुकीत ज्योतिबांचा माळी या शूद्र जातीमुळे प्रचंड अपमान केला “चांडाळ स्पर्श केला” असे म्हणून त्यांना हाकलून दिले. या घटनेने ज्योतिबांच्या मनावर खूप परिणाम झाला. आणि म्हणूनच या घटनेने व्यथित होऊन त्यावर विचार,चिंतन करून, याचे मूळ बहुजनांच्या अज्ञानात आहे हे त्यांना कळून चुकले. “विद्ये विना मती गेली, मतीविना नीती गेली, नितीविना गती गेली ,गती विना वित्त गेले, वित्तविन शुद्ध खचले, इतके अनर्थ एका अविद्येने केले” आणि म्हणूनच हंटर कमिशनला ज्योतिबा फुले यांनी इंग्रजीत आपले म्हणणे मांडले. जे निवेदन “स्टेटमेंट फॉर द इन्फॉर्मेशन ऑफ एज्युकेशन कमिशन “या नावाने सादर केले होते. त्यात ते म्हणतात “बहुजनांच्या सर्व मुली, मुलांना बारा वर्षापर्यंत प्राथमिक शिक्षण सक्तीचे आणि मोफत द्यावे. सरकारला मिळणारा महसूल बहुजनांचा आहे. आणि याच महसुलावर ब्राह्मण शिक्षण घेतात. पण बहुजनांना शिक्षण घेण्यास विरोध करतात.”आता तरी तुम्ही मागे घेऊ नका ,धिक्कारुनी टाका मनुमत, विद्या शिकताच पावाल ते सुख, घ्यावा माझा लेख ज्योती म्हणे ” ज्योतिराव एक आदर्श पती होते. मूलबाळ होत नसल्याने लोक सावित्रीबाईला वांझोटी म्हणत. परंतु ज्योतिबांनी सावित्रीमाईंना साथ देऊन दुसरे लग्न न करता आदर्श पतीचे उदाहरण दाखवून दिले. ज्योतिराव व्यवस्था परिवर्तनाचे काम करीत असताना ते थांबत नाही, म्हणून ब्राह्मण मंडळीनी 1856 ला त्यांची हत्या करण्यासाठी मारेकरी पाठवले. परंतु ज्योतिरावांचे कामाचे महत्त्व कळल्यानंतर मारेकऱ्यांचे मतपरिवर्तन झाले.आणि ते ज्योतिबांचे अनुयायी बनले. काशीबाई नावाची विधवा ब्राह्मण स्री चुकीचे पाऊल पडल्यामुळे गर्भवती होते. आणि आत्महत्या करणार तर वेळेवर ज्योतिबा तिला वाचवतात. आणि सावित्रीबाईंना पूर्ण हकीगत सांगून तिचे बाळंतपण करून तिला जो मुलगा होतो , त्याला दत्तक घेतात आणि हाच पुढे डॉक्टर यशवंत बनतो. अनेक अनाथाश्रम, बालसुधारगृह भ्रुण हत्या प्रतिबंध गृह यामुळे स्त्रियांना खूप मोठा आधार मिळाला. त्यांनी केशवपन ही प्रथा बंद केली. आणि विधवा पुनर्विवाह सुरू केले. 1869 ला ज्योतिरावांनी सहकारी मित्रांसह रायगडावरील समाधी शोधली. यानंतर शिवसमाधी जिर्णोद्धार कमिटी स्थापन करून पुणे येथे 19 फेब्रुवारी 1870 ला पहिली शिवजयंती सार्वजनिक रूपात साजरी केली. ज्योतिबांनी 1883 मध्ये शेतकऱ्यांचा असूड हे पुस्तक लिहिले . या पुस्तकात शेती , शेतकरी आणि सुधारणा यासाठीचे मार्गदर्शन आहे. या ग्रंथाचे छत्रपती शाहू महाराज यांनी कोल्हापूर संस्थानात सामूहिक वाचन घेतले होते. मात्र दुर्दैवाने खेद वाटते की आज आमच्या 85% शेतकऱ्यांनी तो ग्रंथ पाहिलाही नाही, वाचन तर फार दूर. हा ग्रंथ वाचला, तर नक्कीच शेतकरी आत्महत्या होणार नाहीत. ज्योतिबांनी प्रबोधनकार नाटककार पोवाडे ग्रंथ लेख पत्रे काव्यरूप अभंग रूप अखंड असे क्रांतीकारक साहित्य लिहिले. 1855 साली देशातील पहिले सामाजिक नाटक आहे. नाटक हे त्या काळातील प्रभावी माध्यम होते. या नाटकात ब्राह्मण भिक्षुक हा माळी,कुणबी यांच्या घरातून गृहदशा, भविष्य कथन, ब्राह्मण भोजन यासाठी कुणबी बाईला फसवतो आणि तेही त्या बाई च्या घरात पैसे नसताना. ज्योतिबा आणि सावित्रीबाईंनी 1848 मध्ये पुण्यात पहिली मुलींची शाळा सुरू केली. ही फक्त शाळा नव्हती, तर संपूर्ण देशातील सामाजिक बदलाची सुरुवात होती. त्या काळात स्त्री शिक्षणाला भीषण विरोध होता .परंतु फुले दांपत्याने कोणत्याही भीतीपोटी आपला मार्ग सोडला नाही. 1873 मध्ये ज्योतिबांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. या समाजाच्या माध्यमातून त्यांनी धर्माच्या नावाखाली चालणाऱ्या अन्यायाविरुद्ध आवाज उठवला. ज्योतिबा फुलेंनी केवळ आपले विचार मांडले नाहीत तर ते प्रत्यक्ष कृतीत उतरवले. त्यांनी धर्म, जाती, लिंग या सर्व भेदांवर प्रहार करत समतेच्या आणि स्वातंत्र्याच्या मूल्यावर आधारित समाज घडवण्याचा प्रयत्न केला. त्यांचे कार्य हे स्त्रिया, दलित, शेतकरी, मजूर, गरीब या सर्वांसाठी होते. प्रत्येक वीराची अथवा महात्म्याची त्याच्या कर्तुत्वाची परीक्षा जग मोठ्या सचोटीने घेते. आणि त्या जगाला काळ हा त्याच सचोटीने नीट निरखून पाहतो. याचे उदाहरण 1877 सालचा भयंकर दुष्काळ. भयंकर दुष्काळामुळे लोकांवर अत्यंत दुःखद प्रसंग उदभवला. यावर्षी देशातील लाखो लोकांनी अन्न म्हणून आपले प्राण सोडले झाडपाला देखील संपला. पशुंचे खाद्य सुद्धा लोकांना पुरेनात. आईबाप आपल्या पोटाच्या मुलांना देखील ओळखतात. मग नात्यागोत्याची गोष्ट तर दूरच. या दुष्काळात हिंदुस्थानातील 20 कोटी लोकसंख्येपैकी दोन कोटी लोक अन्नावाचून भुकेने चरफडून मेले.दुष्काळ जाहीर होऊन दोन ते चार आठवडे होत नाहीत, तोच ज्योतिबांनी पुणे येथे धनकवडी कॅम्पवर छात्रालय उघडले. या छात्रालयात रोज सकाळी 1000 आणि संध्याकाळी 1000 ज्वारी बाजरीच्या भाकरी लहान मुलांना वाटण्यात येत लहान अर्भकापासुन ते बारा वर्षे वयापर्यंतच्या मुलांनाच फक्त डाळीचे पाणी व भाकर अथवा भाजी व भाकर मिळे. आपल्या राष्ट्रातील आधुनिक उपयुक्त सुधारणांचे उत्पादकत्व जसे ज्योतिबाकडे जाते तसेच आपल्या देशातील स्वराज्याच्या आणि स्वातंत्र्याच्या चळवळीचे जनकत्व देखील त्यांच्याकडेच जाते.आमच्या देशावर आमच्या लोकांचे, राजाचे नव्हे, राज्य असावे ,अशी कल्पना त्यावेळेस च्या कोणत्याही देशभक्ताच्या डोक्यात उत्पन्न झाली नव्हती. त्यावेळी ते विचार महात्माजीनी आपल्या “सार्वजनिक सत्यधर्म “या पुस्तकात लिहिले आहे. त्या पुस्तकाच्या “सत्य” या प्रकरणातील सातव्या कलमात ते लिहितात, आपल्या सर्वांच्या निर्माणकर्ता ने एकंदर सर्व मानव, स्त्री-पुरुषास धर्म, राजकीय स्वातंत्र्य दिले आहे. आपल्या सर्वांच्या निर्मिकाने एकंदर सर्व प्राणीमात्रास उत्पन्न करतेवेळी मनुष्यास जन्मतः स्वतंत्र प्राणी निर्माण केला आहे. आणि त्यास आपापसात सारखे हक्कांचा उपभोग घेण्यास समर्थ केले आहे. आणि याच कारणास्तव प्रत्येक मनुष्यस्वभाव गावातील व मूलखातील अधिकाऱ्यांच्या जागा चालविण्याचा अधिकार आहे. यावरून हेच समजते की ज्योतिरावांचे राजकीय क्षेत्रातील कार्य किती थोर व अमर्याद आहे. ज्योतिबा हे देशात एक पहिले पट्टीचे देशभक्त होऊन गेले आहेत. यात शंकाच नाही. ते जसे धार्मिक व सामाजिक स्वातंत्र्यासाठी जन्मभर लढले, त्याचप्रमाणे देशातील त्यावेळच्या राजकीय वातावरणात भाग घेऊन गरीब दुबळ्यांसाठी ते सरकारशीही वेळोवेळी झगडले व भिक्षुक शाही प्रमाणेच शेवटी नोकरशाहीच्या रोषासही ते पात्र झाले. ज्योतिबा हे राजकीय स्वातंत्र्याचे किती चाहते होती हे कळते. श्रीमंत सयाजीराव महाराजांनी महात्मा फुले यांना हिंदुस्थानचा वॉशिंग्टन म्हटले आहे. घणाचे घास घाव सोसल्यास जशी हिऱ्याची किंमत झाल्याशिवाय राहत नाही, त्याचप्रमाणे सामाजिक क्षेत्राच्या ऐरणीवर संकटाचे घण शोषून अखेर ज्योतिरावांचे तेज हिऱ्याप्रमाणे चमकल्याशिवाय राहिले नाही. सण 1888 च्या मे महिन्यात 11 तारखेस कोळीवाडा हॉलमध्ये मुंबई शहरातील नागरिकांनी एक जंगी जाहीर सभा बोलावली. या सभेत ज्योतिरावांना महात्मा ही पदवी अर्पण करण्यात आली. त्यांनी लिहिलेल्या “सार्वजनिक सत्यधर्म” या ग्रंथात जगातील धर्मांधांना दिलेला सूर्यप्रकाश आहे. रचलेल्या सुधारणा रुपी इमारतीवर हा मंगल कळस आहे. यात सत्याचे सार आहे. आणि हा ग्रंथ म्हणजे माणसाला माणुसकी देणारी कामधेनु होय. उभ्या आयुष्यात या महात्म्याला जगाने अनेक वेळा छळले व दूर लोटले परंतु त्यांच्या जन्माच्या सोबतीनीने प्रथम पासून ते अखेरच्या घडी पर्यंत साथ दिली. सावित्रीमाई साध्वी होती, वीर पत्नी होती, सत्यवती होती. ज्योतिबांचे सारे तेज, सारे धैर्य, सारे कर्तुत्व, आणि सारे महात्म्य या साध्वीच्या तपामुळे चमकले. या महात्म्याने इहलोकाचा त्याग केला, तेव्हा महाराष्ट्रातील सारी सुज्ञ ब्राह्मण, ब्राह्मणेतर जनता हळहळली. महात्माजींच्या स्वर्गवासाची बातमी कळताच अनेक गोरगरीब, महार मांगांच्या डोळ्यातून दुःखाश्रूंची टिप्पं पडली. अबलांचा वाली, दीनदुबळ्यांचा कैवारी व पुणे नगरीचा हिरा आज हरपला. या पुण्यपुरुषाचे जीवन सर्व जातींकरता सारखे होते. म्हणून त्यांच्या पवित्र कायेला सर्व जातीच्या लोकांनी खांदा दिला . स्मशान यात्रेला महार मांगापासून, ब्राह्मणापर्यंत तर मुसलमान धर्माचे देखील दीड ते दोन हजार पर्यंत लोक होते. आणि येथेच या महात्म्याची चरित्र संपले. आणि तरीही खेदाची गोष्ट अशी की आम्हाला महात्मा फुले यांचा गंजपेठ येथील फुलेवाडा आजही माहीत नाही. आम्ही पुण्याला गेल्यावर तिथे जातही नाही. आमच्या अनेक माय बहिणींना दगडूशेठ हलवायचा गणपती माहित आहे. पण क्रांतीसथळ भिडेवाडा माहीत नाही. आज जे सर्व आमच्या बहिणींना, भारतीयांना मिळाले आहे ते केवळ फक्त आणि फक्त कसे मिळाले याचा विचार करणे गरजेचे आहे. कृतघ्नपणा करायचा की कृतज्ञता, याचा सर्वस्वी विचार होणे गरजेचे आहे. कारण महात्मा ज्योतिराव फुले यांचे विचार हे मानव मुक्तीचे होते. आजही बहुजन समाजाला लढण्यासाठी त्यांच्या मार्गदर्शनाची नितांत गरज आहे. सावित्रीबाई फुले या शिक्षणाची प्रेरणा आहेत आणि म्हणून ज्योतिबांचा स्मृतिदिन हा शिक्षक दिन, ज्ञानदीप म्हणून साजरा व्हावा. परंतु दुर्दैवाने येथे नमूद करावेसे वाटते की सर्व महात्मे, समाजसुधारक हे जातींमध्ये वाटले. त्यामुळे बहुजन विभागले गेले. कारण समाजसुधारकांचे कार्य हे सर्व समावेशक समाजातील, सर्व घटकांसाठी होते. त्यांच्या कामात माणूस हाच केंद्रबिंदू होता. जात नव्हती. त्यांचा एकच उद्देश होता, शिक्षण सर्वांना मिळावे. स्त्रियांना समान अधिकार मिळावे, जातीभेद नष्ट व्हावा, आर्थिक, सामाजिक विषमता दूर व्हावी. आम्ही सुद्धा शाळेत असताना आम्हाला या समाजसुधारकांची जात माहित नव्हती हो . परंतु स्वातंत्र्यानंतरच्या राजकारणात अनेक पक्षांनी मतांसाठी जातीचा वापर केला . जो आयतागायत चालूच आहे. आणि म्हणूनच महापुरुषांचे जातीनिहाय विभाजन झाले .आणि याचाच परिणाम समाजात एकत्रित प्रेरणा घेणे ऐवजी समाजसुधारकांचे कार्य फक्त आमच्यासाठी, अशी भावना तयार झाली. आणि म्हणूनच आज गरज आहे ,” महापुरुषांच्या विचारांना जातीभेदा पलीकडे नेण्याचा” आणि म्हणूनच महात्मा फुले यांनी खऱ्या अर्थाने सार्वजनिक क्रांतीचा यलगार केला .”महात्मा फुले तुमचं कार्य अजरामर, सदैव तुमचं नाव आमच्या अंतःकरणांवर ” ज्ञानवंत मानवतायुक्त संस्कार, संपन्न समाज रचनेसाठी महात्मा ज्योतिराव फुले यांच्या कार्याला त्रिवार अभिवादन… ” संघर्ष आरपार आहे, उठ मानवा जागा हो, जुनी जळमट काढून परिवर्तनाचा धागा हो”जय जिजाऊ, जय शिवराय !जय ज्योती, जय भिमराय !!!अँड अर्चना धवलचंद्र आढाव
