
पुस्तक परिचय-तु. सी. ढिकले मो. ७५८८८२८८३४
पुस्तक परिचय:*एका कलासक्त कविची प्रामाणिक पण ऊर्जावान कविता*अभिनेता, दिग्दर्शक, संवादलेखक, गायक, एडिटर राजेश जाधव हे हरहुन्नरी कलाकार आहेत. त्यांना या सर्व कला सहजसाध्य असून ते त्यात कायम व्यस्त असतात. पण तरीही कवितेची नाळ त्यांनी तुटू दिली नाही. ते आपल्या व्यस्त धावपळीतून कवितेसाठी वेळ देतात कारण कविता त्यांचा जीव की प्राण आहे. ते मनाने खूप संवेदनशील असून त्यांच्यात एक ऊर्जावान, उत्साही आणि तरल व्यक्तिमत्त्व सतत संचार करीत असल्याचे दिसते. त्यांची आस्वादक अभिरुची त्यांच्या चालण्या बोलण्यातून कायम जाणवत असते. नोव्हेंबर २०१३ मध्ये शब्दालय प्रकाशनने त्यांचा ‘ इंद्रधनुच्या कमानीवर ‘ हा कवितासंग्रह प्रकाशित केला आहे. इंद्रधनुष्याचा सप्तरंगांप्रमाणे कल्पनेतल्या झुल्यावर कवीमनाचे असंख्य तरंग या संग्रहात पहायला मिळतात. हा कल्पना विलास मनोवेधक आणि आनंददायी आहे. त्यांच्या कवितेची भाषा साधी व त्यामुळे समजायला सोपी आहे. त्यांना संत कबीर, संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर, चोखामेळा, यांच्या बरोबरच अण्णाभाऊ साठे, नारायण सुर्वे, बहिणाबाई यांच्या विचारांचे व त्यांच्या काव्याचेही चांगले आकर्षण आहे. त्यांचा आदर्श त्यांनी कायम त्यांच्या डोळ्यासमोर ठेवलेला असल्याचे जाणवते. त्यामुळेच आपल्या ‘ मी कोण ‘ या कवितेत ते अंतर्मुख होऊन कबूल करतात..*मी कोण येथे लिहिणारा**मजद्वारे लिहून घेतंय कुणी**शब्द, कल्पना, भाव भावना**कानी सांगून जातंय कुणी* या ओळींमधून त्यांची वाटचाल, त्यांचा प्रवास आणि अंतर्मुख करणारी त्यांची विनम्रता याचे प्रत्यंतर येते. त्यांच्या कविता छंदोबद्ध आणि मुक्तछंद दोन्ही प्रकारच्या असून अभंग, भावगीते आणि शाहिरीगीते ही त्यांची आवड आहे. त्यांची ‘ शब्दाचा अभंग ‘ ही पहिलीच अभंग रचना त्यांच्या शब्दप्रभुत्व आणि शब्दलालित्य यांची प्रचिती देते…*शब्दांचीच नक्षी l शब्दांच्याच ओळी l**शब्दांची रांगोळी l अंतरात… ll*यावरून या कलंदर कलावंताची शब्दांची रांगोळी या संग्रहात अशीच जागोजागी पहायला मिळते.ते पुढे म्हणतात…*शब्दातून वाहे l कल्पनेची वीज l**अंकुरते बिज l कवितेचे… ll**शब्द माझा भिडू l शब्द कसा मोडू l**वेळी प्राण सोडू l शब्दासाठी… ll* या संवेदनशील कविच्या संग्रहात आई संबंधी कविता नसेल तरच नवल! आपल्या ‘ आई माझे अस्तित्व ‘ या कवितेत ते म्हणतात…*आई, तुझ्यामुळे मी आनंदी, माझ्या हसण्याचे कारण तू l**आई तुझ्यामुळे माझे अस्तित्व, माझ्या असण्याचे कारण तू ll**तुच घडविले मातीतून, सुंदर मूर्तीत मढविले l**धडाडी आणि चिकाटी, अंगी असण्याचे कारण तू l* आईच्या नाळेची जाण ठेवणाऱ्या या कविची आईची माया शब्दा शब्दातून जाणवत राहते. आणखी एका ‘ आई ‘ या कवितेत ते म्हणतात…*भाकर तुकडा खाऊन आई,**असंच सुखात राहू**वाऱ्यावरती आम्हा पिलांना* *नकोस सोडून जाऊ…*याच रचनेत ते पुढे म्हणतात…*तुच नसता जगात आई**ईश्वर कुणात पाहू**चटके बसतील ऊन तापता**डोईवर मग पदर कुणाचा घेऊ* याच संग्रहात आपल्या ‘ काटा ‘ या भावगीताच्या अंगाने लिहिलेल्या कवितेत ते म्हणतात…*माय चालली शेतात, तिच्या पायी रुते काटा**सारे शहारले रान, अन् व्याकुळल्या वाटा*ही संपूर्ण रचना प्रतिमा आणि प्रतिके यांनी सजलेली आणि भावस्पर्शी अशी अप्रतिम झालेली आहे. ‘ माझ्या माहेरची एस्टी ‘ ही रचना तर पुर्वीच्या अनेक कवितांमधून माहेरवाशीणीला माहेरची बैलगाडी घेऊन आपला भाऊ कधी घ्यायला येईल याची वाट पहाणाऱ्या अनेक गीतांची आठवण करून देते. बैलगाडीची जागा आता आधुनिक युगात एष्टीने घेतल्याची प्रचिती ही कविता देऊन जाते. या कवितासंग्रहात अनेक भावगीत रचना त्यांनी लिहिलेल्या आहेत. मूळात राजेश जाधव हे एक गायक देखील आहेत. त्यामुळे गायकीच्या अंगाने त्यांनी गीतलेखन सुध्दा केलेले आहे. त्यांच्या स्वप्नातल्या कविता म्हणजे सुंदर कल्पना विलास आहे. त्यातूनही एक अंतर्मुख करणारा वेगळा विचार त्यांनी मांडला आहे. त्यांनी राजकारण, दारू, माझ्या जाण्याची खबर,भूत या विषयावर सुध्दा कविता लिहिल्या आहेत. त्यांची श्रद्धास्थाने... गुरूपौर्णिमा, अण्णा हजारे, आदरणीय कै.पु.ल. यांस, अण्णाभाऊ साठे यांच्यावर श्रध्देने कविता लेखन केले आहे. याच कवितासंग्रहात ‘ लोकसंख्या ‘ या विषयावर ” देशाच्या प्रगतीसाठी आता तरी कुटुंब नियोजन करा ” खास हा संदेश देणारी एक दिर्घ परंतु हलकी फुलकी मजेशीर अंगाने जाणारी कविता लिहिली आहे. आपण कुठेही असा. कितीही मोठे व्हा. परंतु शेवटी ” जमिनीवर रहा” हा संदेश देणारी रचना त्यांनी लिहिली आहे…*मुंबईत रहा दुबईत रहा**पॅरिसमध्ये रहा की शांघाईत रहा**कुठेही रहा मित्रा पण जमिनीवर रहा* अशी सुंदर प्रबोधनपर रचना त्यांनी लिहिली आहे. एकूणच ‘ इंद्रधनुच्या कमानीवर ‘ राजेश जाधव यांचा हा पहिला कवितासंग्रह असून त्यात नवखेपणाच्या काही खूणा असल्या तरी त्यांचा हा कवितासंग्रह रसिकांसाठी नक्कीच वाचनीय झाला आहे. त्यांना पुढील कविता लेखनासाठी खूप खूप शुभेच्छा देतो आणि माझा हा थोडक्यातला पुस्तक परिचय थांबवतो.
कवितासंग्रह: इंद्रधनुच्या कमानीवर कवी: राजेश जाधव मो.९४२२२५३७४२प्रकाशन: शब्दालय प्रकाशनमूल्य:१५०/
