
डहाणू ,(प्रगती पाटील डहाणू पालघर) : पालघर जिल्ह्यातील मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर धानिवरी परिसरात सोमवारी भीषण अपघात घडून १३ जणांचा मृत्यू झाला असून २५ जण गंभीर जखमी झाले आहेत. भरधाव कंटेनरने वरातीच्या ट्रकला जोरदार धडक दिल्याने हा दुर्दैवी अपघात घडला. अपघातानंतर परिसरात एकच खळबळ उडाली असून महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती.मिळालेल्या माहितीनुसार, वरातीतील लोकांनी भरलेला ट्रक साखरपुड्याच्या कार्यक्रमासाठी जात होता

. ट्रकमध्ये १०० हून अधिक लोक प्रवास करत होते. धानिवरीजवळ समोरून येणाऱ्या कंटेनरचा मागील भाग अचानक वेगळा होऊन तो ट्रकवर आदळला. धडक इतकी भीषण होती की ट्रकचा मागील भाग पूर्णपणे दबला गेला. अनेक प्रवासी ट्रकमध्ये अडकले होते. स्थानिक नागरिक, पोलीस आणि बचाव पथकांनी तात्काळ मदतकार्य सुरू करून जखमींना बाहेर काढले.या अपघातात सुरेश रत्ना लाखात, पांडू गणपत लाखात, काळू गोविंद लाखात, सुनील अर्जुन दांडेकर, चिमा गोविंद कुरहाडा, नमिता विठ्ठल दांडेकर, सारिका संतोष लाखात, आयुष्य सिताराम लाखात, सागर नामदेव शेंडे, वंदना शिवराम वळवी, सलोनी शिवराम वळवी, अजय अहाडी आणि रियांशी संतोष लाखात यांचा मृत्यू झाला असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.घटनेची माहिती मिळताच खासदार हेमंत विष्णू सावरा तसेच भाजप पालघर जिल्हाध्यक्ष भरत राजपूत यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी जखमींना मदत करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या तसेच पीडित कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांना धीर दिला. जखमींवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू असून पोलिसांकडून पुढील तपास करण्यात येत आहे.
