
नाशिक:( प्रतिनिधी)- निसर्गात सर्वकाही अमर्याद आहे. मात्र वेळ आणि काळ आपल्या मुठीत सामावेल इतकंच आपलं आयुष्य असतं. तसेच साहित्यातून असंख्य वाटा-वळणे-दिशा भेटत जातात. कारण कविता म्हणजे जगण्याचं सुंदर तत्त्वज्ञान आहे, असे प्रतिपादन माजी सनदी अधिकारी बी.जी.वाघ यांनी केले.
गिरणा गौरव प्रतिष्ठान संचलित महाराष्ट्र राज्य गिरजा महिला मंचच्या वतीने चौथ्या ‘काळजातली आई’ या महिला कविसंमेलनात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी गिरणा गौरव प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुरेश पवार होते. हुतात्मा स्मारकचे व्यवस्थापक सुनील साळवे यांच्या हस्ते कविसंमेलनाचे उद्घाटन करण्यात आले.
बी.जी.वाघ पुढे म्हणाले की, साहित्य हा चिंतनाचा विषय असला पाहिजे. व्यक्तीला आकलन करण्यासाठी साहित्याची गरज भासते. व्यक्त होण्यासाठी कवितेची निर्मिती होते. तीच खरी साहित्याची साधना आहे, असेही ते म्हणाले. अध्यक्षीय भाषणात सुरेश पवार म्हणाले की, विश्वनिर्मितीची जननी म्हणजे आई, विचारांची जाणीव म्हणजे आई. काळजातली आई व्यक्त करण्यासाठी शब्दांची कलात्मक मांडणी करणाऱ्या काळजातली आई या संमेलनात सहभागी झालेल्यांची लेखणी समृद्ध होत जाईल, असा विश्वास व्यक्त केला. जिल्हाध्यक्ष शितल कुयटे, राज्य सरचिटणीस भारती निकम, शहराध्यक्ष आशा गोवर्धने, सटाणा तालुकाध्यक्ष पुष्पा जाधव यांनीही मनोगत व्यक्त केले. परीक्षण ज्येष्ठ साहित्यिका अलका दराडे यांनी केले.
कवयित्री मालती चव्हाण-सटाणा (प्रथम), कल्पना वारगे-ठाणे (द्वितीय), चंद्रकला अमृतकर (तृतीय), आशा गोवर्धने (उत्तेजनार्थ) यांना बक्षीस देण्यात आले. संमेलनात सारिका सोनजे, सुनंदा पाटील, सुनीता पाटील, गायत्री गवारे, संगीता मुसळे, दीपश्री मेणे, नेहा कोठावदे, कालिंदी वाणी, सुवर्णा वाणी, शुभांगी भोकरे, मृदुला मराठे, शितल वाणी, वनमाला पाटील, प्रा.आशा पाटील, श्रद्धा जाधव, वैशाली सूर्यवंशी, भारती घुले, सम्राज्ञी सूर्यवंशी, सुजाता येवले, सुशीला पिंपरीकर, कविता बिरारी, सपना फुल्लानी, प्रियांका बुब, शुभांगी पाटील, स्वाती सांगळे, शितल मंडवधरे, भारती देव, पूजा मोरे, गायत्री बाविस्कर, प्राची पुरे, प्रतीक्षा अहिरे, वंदना वाणी, रचना चिंतावार, अनिता जाधव, सुशीला संकलेचा, संध्या भांगरे, कविता कासार, माधुरी अमृतकर आदी कवयित्रींनी सहभाग नोंदवला. प्रास्ताविक कार्याध्यक्ष पूजा दंडगव्हाळ यांनी केले. आभार सुशीला संकलेचा यांनी मानले. सूत्रसंचालन चांदवड तालुकाध्यक्ष सविता दरेकर यांनी केले.
