
पुणे :(प्रतिनिधी ) मालमत्ता खरेदी-विक्री प्रक्रियेत नागरिकांना मोठा दिलासा देणारा निर्णय नोंदणी व मुद्रांक विभागाने घेतला आहे. मालमत्तेचे मूल्यनिर्धारण (व्हॅल्युएशन) आता ऑनलाइन पद्धतीने करण्यात येणार असून, त्यामुळे दुय्यम निबंधक कार्यालयातील फेऱ्यांपासून नागरिकांची सुटका होणार आहे. ही सुविधा महिनाभरात सुरू होण्याची शक्यता आहे.
सध्या मालमत्तेच्या खरेदी-विक्रीवेळी मूल्यनिर्धारणासाठी नागरिकांना कार्यालयात जाऊन अर्ज करावा लागतो. त्यानंतर आवश्यक कागदपत्रांची पडताळणी करून शुल्क भरावे लागते. या प्रक्रियेत अनेक दिवसांचा कालावधी लागत असल्याने नागरिकांना वेळ व आर्थिक खर्च सहन करावा लागत होता.
नवीन ऑनलाइन प्रणालीमुळे नागरिकांना घरबसल्या मालमत्तेचे व्हॅल्युएशन करता येणार आहे. जागेचे क्षेत्रफळ आणि सर्वे क्रमांक पोर्टलवर टाकल्यानंतर ऑनलाइन शुल्क भरून अवघ्या २४ तासांत डिजिटल स्वाक्षरीसह व्हॅल्युएशन प्रमाणपत्र उपलब्ध होणार आहे.
विभागातील अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही प्रक्रिया सध्या प्रायोगिक तत्त्वावर सुरू असून लवकरच संपूर्ण राज्यभर लागू करण्यात येणार आहे. या निर्णयामुळे कार्यालयातील गर्दी कमी होईल, भ्रष्टाचाराला आळा बसेल आणि नागरिकांचा वेळ वाचेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.
नागरिकांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन नोंदणी व मुद्रांक विभागाकडून करण्यात आले आहे.
