
निफाड (पंडित मुदगुल,निफाड/नाशिक): जादूटोणा आणि अघोरी विद्येच्या नावाखाली एकाच कुटुंबातील महिलेसह तिच्या तीन निष्पाप मुलींचे लैंगिक आणि आर्थिक शोषण करणाऱ्या येवला येथील भोंदू बाबा अजीज रज्जाक शेख उर्फ सूफी अब्दुल अजीज याला नाशिक जिल्हा न्यायालयाने ‘मरेपर्यंत जन्मठेपे’ची (अजीवन कारावास) कठोर शिक्षा ठोठावली आहे. या ऐतिहासिक आणि अत्यंत महत्त्वाच्या निकालामुळे परिसरात खळबळ उडाली असून, भोंदूगिरी करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.मिळालेल्या माहितीनुसार, येवला येथील आरोपी भोंदू बाबा अजीज रज्जाक शेख याने एका पीडित महिलेच्या कौटुंबिक अडचणींचा गैरफायदा घेतला. घरात जादूटोणा, करणी-बाधा असल्याचे सांगत, ती दूर करण्याचा बहाणा करून त्याने महिलेचा विश्वास संपादन केला. या अघोरी विद्येच्या नावाखाली त्याने केवळ त्या महिलेचेच नव्हे, तर तिच्या तीन तरुण मुलींचेही भयानक लैंगिक शोषण केले. याशिवाय, भीती दाखवून त्याने या कुटुंबाकडून मोठ्या प्रमाणावर आर्थिक लूटही केली होती.या जाचाला कंटाळल्यानंतर पीडित कुटुंबाने या नरकातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आणि हा संपूर्ण प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करत भोंदू बाबाला बेड्या ठोकल्या होत्या.नाशिक जिल्हा न्यायालयात या खटल्याची सुनावणी झाली. सरकारी वकील आणि पोलिसांनी सादर केलेले सबळ पुरावे, वैद्यकीय अहवाल आणि पीडितांची साक्ष यांच्या आधारे न्यायालयाने आरोपीवरील गुन्हे सिद्ध मानले. भोंदूगिरीच्या नावाखाली महिला आणि मुलींच्या असहाय्यतेचा गैरफायदा घेणारे हे कृत्य समाजाला काळिमा फासणारे असल्याचे स्पष्ट करत, न्यायालयाने अजीज रज्जाक शेख याला *मरेपर्यंत अजीवन कारावासाची* शिक्षा सुनावली. ‘अंनिस’कडून निकालाचे स्वागत; भोंदूगिरीवर वचक बसेल हीच अपेक्षाया खटल्यात पीडित कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी ‘महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती’ने (अंनिस) सुरुवातीपासूनच महत्त्वाची भूमिका बजावली होती. न्यायालयाच्या या ऐतिहासिक निर्णयावर ‘अंनिस’ने समाधान व्यक्त केले आहे.”सदर पीडित महिलेने महाराष्ट्र अंनिसशी संपर्क केला होता. अंनिसने तिला कायदेशीर आणि मानसिक धीर देत मदत केली होती. आज न्यायालयाने दिलेल्या या निर्णयाचे आम्ही मनापासून स्वागत करतो. सध्या समाजात ठिकठिकाणी भोंदू बाबांचे पेव फुटले आहे; मात्र या अत्यंत कठोर निर्णयामुळे अशा प्रवृत्तींवर नक्कीच वचक बसेल आणि समाजातील भोंदूगिरी कमी होईल, हीच आमची अपेक्षा आहे.”*– कृष्णा चांदगुडे(राज्य कार्यवाह, महाराष्ट्र अंनिस)*या निकालामुळे कायद्याचे हात किती लांब आहेत आणि अघोरी कृत्य करणाऱ्यांना समाजात स्थान नाही, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. नागरिकांनी कोणत्याही भोंदू बाबा, मांत्रिक किंवा तांत्रिकाच्या आमिषाला किंवा भीतीला बळी पडू नये, असे आवाहनही या निमित्ताने अंनिस आणि प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
