
नाशिक | (प्रतिनिधी ) छावा क्रांतिवीर सेनेच्या वतीने धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांची ३६९ वी जयंती नाशिक शहरात अत्यंत उत्साहपूर्ण आणि भक्तीमय वातावरणात साजरी करण्यात आली.नाशिक येथील सिटी सेंटर मॉल परिसरातील धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चौक येथे उभारण्यात आलेल्या स्मारकस्थळी दुग्धाभिषेक,पुष्पहार अर्पण व अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमाला छावा क्रांतिवीर सेनेचे संस्थापक अध्यक्ष करण गायकर यांच्या शुभहस्ते प्रारंभ करण्यात आला.यावेळी राष्ट्रवादी पक्षाच्या गटनेत्या सौ.सीमाताई ठाकरे,नाशिक जिल्हाप्रमुख आशिष हिरे यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती. कार्यक्रमादरम्यान “जय शिवराय”,“जय शंभूराजे” आणि हिंदवी स्वराज्याचा विजय असो अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता.कार्यक्रमात उपस्थित शिवप्रेमींनी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.तसेच त्यांच्या शौर्य,त्याग आणि राष्ट्रनिष्ठेच्या इतिहासाचे स्मरण करत युवा पिढीने त्यांच्या विचारांचा आदर्श घ्यावा,असे आवाहन करण्यात आले.यावेळी मार्गदर्शन करताना करण गायकर म्हणाले की,धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा इतिहास हा केवळ महाराष्ट्रापुरता मर्यादित नसून संपूर्ण देशासाठी प्रेरणादायी आहे.हिंदवी स्वराज्य टिकवण्यासाठी आणि हिंदू धर्माच्या रक्षणासाठी त्यांनी दिलेले बलिदान इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिले गेले आहे.औरंगजेबासारख्या बलाढ्य सत्तेसमोर न झुकता त्यांनी स्वाभिमान आणि धर्मनिष्ठा जपली.त्यामुळे शंभूराजे हे केवळ राजे नव्हते,तर स्वाभिमानाचे जिवंत प्रतीक होते.”ते पुढे म्हणाले की,छत्रपती शिवाजी महाराजांनी उभे केलेले हिंदवी स्वराज्य अधिक सक्षम करण्यासाठी संभाजी महाराजांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. त्यांनी युद्धकौशल्याबरोबरच विद्वत्ता आणि साहित्य क्षेत्रातही मोठे योगदान दिले.संस्कृत,फारसीसह विविध भाषांवरील प्रभुत्व आणि ‘बुधभूषण’सारख्या ग्रंथांची निर्मिती ही त्यांची असामान्य बुद्धिमत्ता दर्शवते. आजच्या युवकांनी व्यसनमुक्त राहून शिवचरित्राचा अभ्यास करावा आणि स्वराज्य,समाज व राष्ट्रासाठी कार्य करण्याची प्रेरणा संभाजी महाराजांकडून घ्यावी.”कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी धर्मवीर संभाजी महाराजांच्या कार्याचा गौरव करत त्यांच्या विचारांचे संवर्धन करण्याची गरज व्यक्त केली.तसेच हिंदवी स्वराज्याची प्रेरणा घराघरात पोहोचवण्यासाठी सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रम अधिक व्यापक प्रमाणात राबविण्याचा संकल्प करण्यात आला.या जयंती महोत्सवासाठी छावा क्रांतिवीर सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष सुभाष गायकर,नाशिक जिल्हाप्रमुख आशिष हिरे,महिला आघाडी महाराष्ट्र राज्य संपर्कप्रमुख संगीताताई सूर्यवंशी, अमोल गांगुर्डे नाशिक महानगर प्रमुख योगेश गांगुर्डे,उत्तर महाराष्ट्र संपर्कप्रमुख सागर जाधव,सरपंच दीपक हगवणे शुभम महाले,ज्ञानेश्वर भोसले,आकाश जाधव,युवराज डुंबरे,बॉबी निकम देवा हिरे अक्षय कातड यांच्यासह अनेक पदाधिकारी,कार्यकर्ते व शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचा समारोप छत्रपती संभाजी महाराजांच्या जयघोषाने आणि राष्ट्रगीताने करण्यात आला.
